शवविच्छेदन गृहाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:08 IST2021-04-09T04:08:46+5:302021-04-09T04:08:46+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : संपूर्ण तालुक्यासाठी सावनेर शहरात एकमेव शवविच्छेदनगृह आहे. याठिकाणी तालुक्यातील पाच प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गतच्या गावातील ...

शवविच्छेदन गृहाची दुरवस्था
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : संपूर्ण तालुक्यासाठी सावनेर शहरात एकमेव शवविच्छेदनगृह आहे. याठिकाणी तालुक्यातील पाच प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गतच्या गावातील घटना वा अपघातातील मृतदेह शवविच्छेदनासाठी आणले जातात; परंतु या शवविच्छेदनगृहाची झालेली दुरवस्था व असुविधांमुळे मृतांच्या नातेवाइकांना नाहक मनस्ताप साेसावा लागत आहे. या गंभीर बाबींकडे संबंधित विभागाचे दुर्लक्षच हाेत आहे.
सावनेर येथील शासकीय रुग्णालय तसेच तालुक्यातील केळवद, खापा, बडेगाव, पाटणसावंगी व चिचाेली प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गतच्या १३६ गावांतील विशेष घटना, अपघातातील मृतदेह येथील शवविच्छेदनासाठी आणले जातात. मात्र, हे शवविच्छेदनगृह सध्या विविध समस्येने ग्रासले आहे. येथे रात्रीच्या सुमारास सर्वत्र अंधार असताे. शिवाय, शवविच्छेदनगृहाला संरक्षक भिंत नसल्याने परिसरात माेकाट कुत्री व जनावरांचा सतत वावर असताे. अशावेळी मृताच्या नातेवाइकांची माेठी तारांबळ उडते. नातेवाइकांना थांबण्यासाठी जागा नाही. रात्री-अपरात्री, दिवसा उन्हात ताटकळत उभे राहावे लागत असल्याने नागरिकांत असंताेष धुमसत आहे.
अपघात व इतर घटनांतील मृतदेह पाेलीस वा मृतांचे नातेवाईक येथे शवविच्छेदन करण्यासाठी येतात; परंतु पाेलीस कर्मचारी व नातेवाइकांनाही माेठा त्रास सहन करावा लागताे. रात्रीच्या सुमारास अंधारात मृतदेहाची ने-आण करणे अतिशय कठीण हाेत असल्याच्या प्रतिक्रिया पाेलीस कर्मचाऱ्यांनी दिल्या. शिवाय, किरकाेळ कारणामुळे तासन्तास ताटकळत राहावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या शवविच्छेदनगृहाची दुरुस्ती करून याठिकाणी आवश्यक साेयीसुविधा उपलब्ध करणे गरजेचे झाले आहे. वरिष्ठ अधिकारी व लाेकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष पुरवून उपाययाेजना करण्याची मागणी नागरिकांची आहे.
...
प्रत्येक आराेग्य केंद्रात शवविच्छेदनगृह उभारा
मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी नाेंदणीकृती एमबीबीएस डाॅक्टर असणे गरजेचे असते. ग्रामीण भागात पदवीप्राप्त डाॅक्टर नसताे. त्यामुळे अनेकदा शवविच्छेदनाची समस्या उद्भवते. त्यामुळे प्रत्येक प्राथमिक आराेग्य केंद्रात शवविच्छेदनगृह उभारून तेथे सर्व सुविधा पुरविल्या जाव्यात. तसेच पदवीप्राप्त डाॅक्टराची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.