‘ऑक्सिजन’अभावी रुग्णभरतीवर संक्रांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:08 IST2021-04-20T04:08:43+5:302021-04-20T04:08:43+5:30
योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘ऑक्सिजन’अभावी ‘कोरोना’ रुग्णांसमोर अनेक अडचणी उभ्या राहत असून दिवसेंदिवस स्थिती खराब होत ...

‘ऑक्सिजन’अभावी रुग्णभरतीवर संक्रांत
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘ऑक्सिजन’अभावी ‘कोरोना’ रुग्णांसमोर अनेक अडचणी उभ्या राहत असून दिवसेंदिवस स्थिती खराब होत आहे. ‘ऑक्सिजन’च्या कमतरतेचा फटका आता ‘कोरोना’ रुग्णालये व ‘कोविड केअर सेंटर’लादेखील बसतो आहे. आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन सिलिंडर्सचा पुरवठा नसल्याने काही खाजगी रुग्णालयांत गंभीर असलेल्या नवीन रुग्णांची भरतीच थांबविण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मागील काही दिवसांपासून ‘कोरोना’बाधितांची संख्या वाढत असून ‘ऑक्सिजन’ची मागणीदेखील वाढली आहे. त्यातच जिल्हाधिका-यांनी ‘कोविड’ रुग्णालये, कोविड केअर सेंटर यांच्यासह खाजगी रुग्णालयांना ‘ऑक्सिजन’पुरवठ्यासंदर्भात १५ एप्रिल रोजी परिपत्रक जारी केले. यात एक यादी देण्यात आली व नावासमोर दर्शविलेल्या रिफिल किंवा सिलिंडरचा पुुरवठा करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.
मात्र, मागणी जास्त असल्याने नियमित पुरवठा होण्यास अडचणी आहेत. ‘रिफिलिंग’साठी ‘सिलिंडर’ पाठविल्यावर ते परत येण्यासाठी बराच वेळ लागत आहे. ‘रिफिलिंग’साठी लांब रांगा आहेत. या कालावधीत ‘ऑक्सिजन’ची गरज जास्त भासत आहे. अशा स्थितीत गंभीर असलेल्या रुग्णांवर उपचारांत अनेक अडचणी येत आहे. हीच बाब लक्षात घेता काही रुग्णालयांनी गंभीर रुग्णांना दाखल करून घेण्यासच नकार दिला आहे. गंभीर रुग्णांसाठी आवश्यक प्रमाणात ‘ऑक्सिजन’ मिळत नसेल, तर त्यांच्यावर उपचार होणार तरी कसे, असा प्रश्न रुग्णालयाकडून उपस्थित करण्यात येत आहे.
गंभीर रुग्णांना भरती करणार कसे?
‘ऑक्सिजन’च्या पुरवठ्याचे अधिकार आता जिल्हाधिका-यांच्या नियंत्रणात गेले आहेत. त्यामुळे पुरवठा लवकरच रुळांवर येईल, अशी आशा आहे. मात्र, सध्या मागणी जास्त असल्याने आवश्यक त्या प्रमाणात ‘ऑक्सिजन’चे ‘सिलिंडर्स’ येत नाहीत. अशा स्थितीत गंभीर रुग्णांना दाखल करणे, ही मोठी जोखीमच आहे. आम्ही कमी किंवा मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना दाखल करून घेतो आहे. मात्र, गंभीर रुग्ण असतील तर आमचादेखील नाइलाज आहे, अशी माहिती ‘कोविडालय’चे संचालक डॉ. मोहन गायकवाड यांनी दिली.
असा होतोय ‘ऑक्सिजन’चा पुरवठा
सद्य:स्थितीत मेडिकलसह शहरातील ११ रुग्णालयांना ६१.५ मेट्रिक टन ‘ऑक्सिजन’पुरवठ्याची गरज आहे. तर, जिल्ह्यातील इतर १७० ‘कोविड’ रुग्णालये, कोविड केअर सेंटर्स येथे ८ हजार ६०० ‘जम्बो सिलिंडर्स’ची आवश्यकता आहे. रिकाम्या झालेल्या ‘सिलिंडर्स’च्या ‘रिफिलिंग’साठीदेखील प्रतीक्षा करावी लागत आहे.