नागपुरात कोविड लसीकरणाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:08 IST2021-01-17T04:08:42+5:302021-01-17T04:08:42+5:30

पाचपावली स्त्री रुग्णालय केंद्रात पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार कोविड लसीकरणाचा प्रारंभ शनिवारी ...

Comvid vaccination started in Nagpur | नागपुरात कोविड लसीकरणाला प्रारंभ

नागपुरात कोविड लसीकरणाला प्रारंभ

पाचपावली स्त्री रुग्णालय केंद्रात पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार कोविड लसीकरणाचा प्रारंभ शनिवारी नागपुरात झाला. मनपाच्या पाचपावली स्त्री रुग्णालय केंद्रावरील लसीकरण मोहिमेचे उद्‌घाटन पालकमंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यासोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, डागा रुग्णालय, एम्स या ठिकाणीही एकाच वेळी लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली.

यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, विभागीय आयुक्त संजीवकुमार, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. दिलीप झळके, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, मनपाच्या वैद्यकीय समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चिलकर उपस्थित होते.

कोविड लसीकरणाच्या नागपुरात यापूर्वी दोन ‘ड्राय रन’ झाल्या. त्याच धर्तीवर पाचपावली केंद्रावर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. सर्वप्रथम आरोग्य विभागातर्फे संदेश प्राप्त झालेल्या व्यक्तींची नोंदणी, त्यांचे तापमान तपासल्यानंतर आणि हात सॅनिटाइज केल्यानंतर त्यांना बसण्यासाठी प्रतीक्षा कक्षाची व्यवस्था, त्यानंतर लसीकरण खोलीत आधार कार्डच्या आधारे व्यक्तींची ओळख पटविण्याची व्यवस्था, त्याची चाचपणी झाल्यानंतर लसीकरण, लसीकरणानंतर अर्धा तास देखरेखीखाली ठेवण्यासाठी असलेली व्यवस्था आदी चोखपणे करण्यात आले होती.

नितीन राऊत यांनी फीत कापून लसीकरण मोहिमेची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी केंद्रावरील व्यवस्थेची पाहणी केली. कर्तव्यावर असलेले अधिकारी- कर्मचारी आणि लसीकरणासाठी आलेल्या व्यक्तींशी संवाद साधला. यावेळी आशीनगर झोनच्या सभापती विरंका भिवगडे, नगरसेवक संदीप सहारे, मनोज सांगोळे, जितेंद्र घोडेस्वार, दिनेश यादव, भावना लोणारे, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार, आशीनगर झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, अतिरिक्त सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, टाटा ट्रस्टचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ. टिकेश बिसेन, मातृत्व आणि बालकल्याण वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली मोहकर, पाचपावली स्त्री रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता बाळकोटे-खंडाईत, आरोग्य विभागाच्या समन्वयक दीपाली नागरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले आदी यावेळी उपस्थित होते.

.....

डॉ. दीपांकर भिवगडे यांनी घेतली पहिली लस

मनपाच्या पाचपावली स्त्री रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपांकर भिवगडे यांनी पहिली लस घेतली. यानंतर प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता बाळकोटे- खंडाईत, नेताजी सुभाषचंद्र बोस नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजूषा विवेकानंद मठपती, मातृत्व व बालकल्याण वैद्यकीय अधिकारी वैशाली मोहकर यांनी लस घेतली. परिचारिका राजश्री फुले आणि रजनी मेश्राम यांनी आरोग्य सेवकांना लस दिली. लस घेतल्यानंतर सर्वांना अर्धा तास निगराणी कक्षात ठेवण्यात आले होते. अर्धा तासापर्यंत त्यांना कुठलाही त्रास जाणवला नाही. त्यामुळे त्यांना घरी पाठविण्यात आले. घरी काही त्रास जाणवल्यास संबंधित रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी अथवा १०८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या. लसीकरणानंतर माध्यमांशी डॉ. दीपांकर भिवगडे यांनी सांगितले की, लस घेण्याचा अनुभव सुखद होता. लस घेतल्यानंतर कुठलाही त्रास जाणवला नाही. ही लस घेण्यात कुठलाही धोका नसून ज्यांनी नोंदणी केली, त्यांनी कुठलीही भीती मनात न बाळगता लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. वैशाली मोहकर म्हणाल्या, लसीकरणानंतर मला काहीही त्रास झाला नाही. कोविडपासून बचाव करण्यासाठी ही लस उपयुक्त आहे. लसीकरणानंतरही कोविडसंदर्भात असलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. लसीकरणाने आत्मविश्वास नक्की वाढेल, असे त्यांनी सांगितले.

डॉ. मंजूषा मठपती म्हणाल्या, ०.५ मिलीचे लसीकरण असून त्याचा कुठलाही विपरीत परिणाम नाही. सोशल मीडियावर असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नका. कोरोना वॉरिअर्स म्हणून आम्ही ही लस सुरक्षित असून लसीकरण करण्याचे आवाहन करीत असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. संगीता बाळकोटे- खंडाईत म्हणाल्या, फ्रंट लाअन वर्करने स्वत:हून समोर येऊन लसीकरण करायला हवे. लसीकरणाच्या वेळी सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

...

आठवड्यातून चार दिवस लसीकरण : नितीन राऊत

उद्‌घाटप्रसंगी राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत म्हणाले, संपूर्ण राज्यात शनिवारी लसीकरणाचा शुभारंभ झाला. नागपूर शहरात पाच केंद्रांवर लसीकरण होत आहे. प्रत्येक केंद्रावर आठवड्यातून चार दिवस लसीकरण होणार असून प्रत्येक दिवशी प्रति केंद्र १०० व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. संपूर्ण यंत्रणा सज्ज असून लस घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या संपर्कात आरोग्य यंत्रणा राहणार आहे. २८ दिवसांनंतर दुसरा डोज देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

.....

आजचा दिवस आनंदाचा : तिवारी

वर्षभरापासून कोविडच्या संक्रमणाने शहर त्रस्त झाले होते. या काळात आरोग्य सेवेतील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली. कोरोनाची साखळी तुटावी, यासाठी प्रयत्न केले. वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर भारतात लस उपलब्ध झाली असून लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज होतोय, आजचा दिवस आनंदाचा असल्याचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी म्हटले.

........

पहिल्या टप्प्यात ‘हेल्थ वर्कर’ला लस : राधाकृष्णन बी.

कोविड लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात केंद्र शासनाच्या निर्देशानुसार कोविड काळात सातत्याने समोर राहून वैद्यकीय सेवा देणाऱ्या ‘हेल्थ वर्कर’ला लस देण्यात येणार आहे. त्यानुसार नागपूर शहरात साडेबावीस हजार आरोग्य अधिकारी- कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आली आहे. नोंदणी झालेल्या या सर्व हेल्थ वर्कसना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार असल्याचे राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.

Web Title: Comvid vaccination started in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.