नागपुरातील डॉक्टर दाम्पत्यामधील वादाची ५० लाखात तडजोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 14:21 IST2017-11-20T14:12:25+5:302017-11-20T14:21:07+5:30
ऐकून कुणालाही आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. शहरातील एका डॉक्टर दाम्पत्यामधील वादाची मध्यस्थी प्रक्रियेद्वारे तब्बल ५० लाख रुपयांत तडजोड झाली आहे.

नागपुरातील डॉक्टर दाम्पत्यामधील वादाची ५० लाखात तडजोड
आॅनलाईन लोकमत
नागपूर : ऐकून कुणालाही आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. शहरातील एका डॉक्टर दाम्पत्यामधील वादाची मध्यस्थी प्रक्रियेद्वारे तब्बल ५० लाख रुपयांत तडजोड झाली आहे. पतीने पत्नीला ही रक्कम दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही तडजोड मान्य करून पतीविरुद्धचा हुंड्यासाठी छळ व इतर गुन्ह्यांचा खटला रद्द केला आहे.
हे दाम्पत्य मनीषनगर येथील रहिवासी आहे. लग्नानंतर ते काही महिने गुण्यागोविंदाने नांदले. त्यानंतर त्यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली. दरम्यान, सोनेगाव पोलिसांनी पत्नीच्या तक्रारीवरून पतीविरुद्ध भादंविच्या कलम ४९८-अ, ५०४, ५०६(२) व ३२३ अंतर्गत एफआयआर नोंदविला. तसेच, तपासानंतर जेएमएफसी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला प्रलंबित असताना या दाम्पत्याने मध्यस्थी प्रक्रियेद्वारे सहमतीने वाद मिटविला. पतीने पत्नीला ५० लाख रुपये देण्याचे तर, पत्नीने पतीविरुद्धचा खटला मागे घेण्याचे मान्य केले. पतीने ही रक्कम कुटुंब न्यायालयात जमा केली. त्यानंतर दोघांनी खटला रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला व वाद सहमतीने मिटविण्याच्या कराराची मूळ प्रत सादर केली. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व मुरलीधर गिरटकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचा ‘गियानसिंग’ प्रकरणातील निर्णय व अन्य विविध बाबी लक्षात घेता दाम्पत्याचा अर्ज मंजूर करून जेएमएफसी न्यायालयातील प्रलंबित खटला रद्द केला.