कॉम्पोनेंट ब्लड मिळेना!
By Admin | Updated: May 24, 2015 02:58 IST2015-05-24T02:58:46+5:302015-05-24T02:58:46+5:30
एका रक्ताच्या पिशवीपासून (होल ब्लड) तीन रक्तघटक (ब्लड कॉम्पोनेंट) तयार करता येतात.

कॉम्पोनेंट ब्लड मिळेना!
नागपूर : एका रक्ताच्या पिशवीपासून (होल ब्लड) तीन रक्तघटक (ब्लड कॉम्पोनेंट) तयार करता येतात. म्हणजेच एका रक्तदात्याने दिलेल्या रक्ताचा उपयोग तीन रुग्णांना होऊ शकतो. परंतु इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) रक्त घटक वेगळे करणारे ‘ब्लड कॉम्पोनेंट सेप्रेटर’ मशीनच नाही. परिणामी, रुग्णाला ‘होल ब्लड’ देऊन ज्यांना ‘कॉम्पोनेंट ब्लड’ची गरज आहे त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला जात आहे.
मेयोमध्ये विदर्भच नाहीतर छत्तीसगड, मध्यप्रदेशातून रुग्ण येतात. यात प्रामुख्याने गंभीर आजार, अपघात आणि बाळंतपणाच्या रुग्णांची संख्या अधिक असते.
उपचारांदरम्यान आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियार करीत असताना रक्त व रक्तघटकाची उपलब्धता महत्त्वाची ठरते. परंतु मेयो रुग्णालयात रक्त घटक वेगळे करणारी यंत्रणाच नाही.
यातच मागणीच्या तुलनेत फार कमी रक्त उपलब्ध होते. यामुळे आधीच तुटवडा असलेल्या मेयोच्या रक्तपेढीत चणचण भासते. परिणामी अनेक रुग्णांच्या नातेवाईकांवर पदरमोड करून खासगी रक्तपेढ्यातून रक्त विकत घेण्याची वेळ येते. (प्रतिनिधी)