आमसभेचे निमंत्रण नसल्याची सदस्यांची तक्रार
By Admin | Updated: September 30, 2014 00:37 IST2014-09-30T00:37:11+5:302014-09-30T00:37:11+5:30
अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेची आमसभा आज शांततेत पार पडली. विषयपत्रिकेवर ठेवलेले विषय सर्व सदस्यांच्या संमतीने मंजूर करण्यात आले. विशेष म्हणजे आमसभेत नेहमीच

आमसभेचे निमंत्रण नसल्याची सदस्यांची तक्रार
नाट्य परिषद : आमसभा शांततेत
नागपूर : अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेची आमसभा आज शांततेत पार पडली. विषयपत्रिकेवर ठेवलेले विषय सर्व सदस्यांच्या संमतीने मंजूर करण्यात आले. विशेष म्हणजे आमसभेत नेहमीच सदस्यांचे आक्षेप आणि वादप्रवाद होतात पण या आमसभेत प्रत्येकच विषय तत्काळ मंजूर होत गेल्याने अवघ्या १५ मिनिटात आमसभा संपली. इतिवृत्त वाचन, अहवाल वाचन, आॅडिटर नेमणे, आलेल्या पत्रांची उत्तरे देणे आदी विषय पत्रिकेवर ठेवण्यात आले होते. यावेळी हिशेबही सांगण्यात आला पण सदस्यांना तो मंजूर करावाच लागला. कारण हिशेबाचा सारा अहवाल थेट बैठकीतच देण्यात आल्याने त्याची तपासणी सदस्यांना करता आली नाही. किमान दोन दिवस आधी हिशेब मिळाला असता तर त्याचा अभ्यास करून त्यावर बोलता आले असते, असे मत काही सदस्यांनी व्यक्त केले.
आमसभेचे निमंत्रणच अनेकांना न मिळाल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली पण एका वृत्तपत्रात जाहिरात दिली होती, असे अध्यक्ष प्रफुल्ल फरकसे यांनी सांगितल्यावर त्यावर कुणी आक्षेप घेतला नाही. कार्यकारिणी २९ वरून १५ ची करण्यात आल्यानंतर उर्वरित सदस्यांना निमंत्रित सदस्य म्हणून स्थान देण्यात आले. पण या निमंत्रित सदस्यांना आमसभेचे निमंत्रण पाठविण्याची तसदी नाट्य परिषदेने न घेतल्याने निमंत्रित सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रफुल्ल फरकसे यांनी आमसभा शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात झाल्याचे सांगितले. दीपरंग नाट्य महोत्सवाच्या आयोजनाबाबत यावेळी फरकसे यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा करण्यात आली.
दिवाळी नंतर आणि राज्य नाट्य महोत्सवाच्या पूर्वी हा महोत्सव आयोजित करण्यासाठी कार्यकारिणी सदस्यांपैकी एकाची प्रकल्प संयोजक म्हणून नेमणूक करायची असे ठरले. याप्रसंगी फरकसे यांनी रमण सेनाड यांना प्रकल्प संयोजक करण्याची शिफारस केली. त्यांच्या या मताला सर्वांनीच दुजोरा दिला. यंदा हा महोत्सव दर्जेदार पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला. जास्त प्रवेशिका आल्यास दीपरंग महोत्सव तीन दिवसांऐवजी पाच दिवस करण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली. (प्रतिनिधी)