जनता दरबारात ४०० वर तक्रारी
By Admin | Updated: June 7, 2015 02:53 IST2015-06-07T02:53:16+5:302015-06-07T02:53:16+5:30
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रविभवन येथे आयोजित जनता दरबाराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ४०० वर तक्रारी व गाऱ्हाणी मांडण्यात आल्या.

जनता दरबारात ४०० वर तक्रारी
नागपूर : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रविभवन येथे आयोजित जनता दरबाराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ४०० वर तक्रारी व गाऱ्हाणी मांडण्यात आल्या. पालकमंत्र्यांच्या या दुसऱ्या जनता दरबारात सर्वाधिक तक्रारी नागपूर सुधार प्रन्यासबाबत प्राप्त झाल्या. त्यानंतर मनपा, आरटीई, माहितीचे अधिकार अधिनियम, महावितरण, एसएनडीएल, भूमापन, महसूल, पोलीस विभाग आदींशी संबंधित तक्रारी होत्या.
या जनता दरबारात सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. अनेक वयोवृद्ध नागरिक, महिला व तरुणांनी आपल्या तक्रारी पालकमंत्री चंदशेखर बावनकुळे यांच्याकडे मांडल्या. काही अपंगंनी सुद्धा आपल्या तक्रारी मांडल्या. प्रत्येक तक्रारदाराचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांच्या मदतीला विशेष कार्य अधिकारी मनोहर पोटे व विशेष अधिकारी संजय धोटे हे होते. प्रशासनातर्फे उपजिल्हाधिकारी प्रकाश शर्मा, जिल्हा नियोजन अधिकारी कृष्णा फिरके व पोलीस अधिकारी उपस्थित होते.
शनिवारी सकाळपासून नागरिकांनी रविभवन येथे तक्रार दाखल करण्यासाठी हजेरी लावली. रविभवनातील सभागृहात पालकमंत्र्यांचा जनता दरबार भरवण्यात आला होता. अधिकारी सकाळपासूनच हजर होते. परंतु सकाळी मिहान येथे कार्यक्रम असल्याने पालकमंत्र्यांचा जनता दरबार उशिरा सुरू झाला. सर्वांसाठी एकच रांग असल्याने काही वेळ गोंधळही उडाला. यावेळी अनेक व्यक्तिगत गाऱ्हाणी सुद्धा मांडण्यात आली. लहानसहान तक्रारी पालकमंत्र्यांनी जागेवरच सोडविल्या तर अनेकांना आश्वासन मिळाले. काहींच्या कामासाठी विशेष बैठक बोलावण्याचे निर्देश देण्यात आले. जवळपास ३० टक्के तक्रारी जनता दरबारातच सोडविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील शासकीय रिक्त पदे लवकरच भरणार
जनता दरबार म्हणजे सर्व सामान्य गरीब जनतेला तक्रारींचे निवारण व थेट अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्याची संधी होय. कोणत्याही अधिकाऱ्याने तक्रारकर्त्यास अनावश्यक त्रास देऊ नये, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना जिल्ह्यातील रिक्त पदांची माहिती मागविली आहे. बरीच पदे रिक्त असल्यामुळे शासकीय कामाचा बोजा वाढलेला आहे. हा बोजा कमी करण्यात येईल, याकरिता आपण प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
नियोजनाचा अभाव, तक्रारकर्ते संतापले
जनता दरबारासाठी तक्रारकर्त्या नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून रविभवन येथे आयोजन करण्यात आले होते. परंतु या जनता दरबारात नियोजनाचा प्रचंड अभाव दिसून आला. तक्रारकर्त्यांसाठी एकच रांग होती. त्यामुळे गर्दी प्रचंड वाढली. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने नागरिक संतापले. सुरक्षेच्या कारणावरून पोलिसांचा त्रास नागरिकांना येथेही सहन करावा लागला. अनेक तक्रारकर्त्यांनी समाधान शिबिराप्रमाणे टोकन पद्धतीचा वापर करायला हवा होता, असे मत व्यक्त केले.
म्हाडाच्या तक्रारींसंदर्भात वेगळी बैठक घेणार
म्हाडासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी असल्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी वेगळी बैठक घेण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
समाधानातील तक्रारीही पालकमंत्र्यांच्या दरबारी
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी समाधान शिबिर घेण्यात आले होते. त्या शिबिरात तक्रार करून आपल्या गाऱ्हाणी मांडणाऱ्या अनेकांनी पालकमंत्र्यांच्या जनता दरबारातही हजेरी लावली. केवळ हजेरीच लावली नाही तर पुन्हा नव्याने तक्रारीचे निवेदन सादर केले. मुख्यमंत्र्यांच्या शिबिरात असमाधान झाल्यानेच पालकमंत्र्यांच्या दरबारात हजेरी लावण्यात आल्याची चर्चा होती.