तक्रार करताच पाण्याचे बिल १२ हजार रुपयांनी कमी
By Admin | Updated: May 31, 2015 02:51 IST2015-05-31T02:51:38+5:302015-05-31T02:51:38+5:30
अवास्तव येत असलेल्या पाण्याच्या बिलासंदर्भात समाधान शिबिरात तक्रार दाखल करताच पाण्याचे बिल तब्बल १२ हजार रुपयांनी कमी करण्यात आल्याचा प्रकार यावेळी उघडकीस आला.

तक्रार करताच पाण्याचे बिल १२ हजार रुपयांनी कमी
आनंद डेकाटे नागपूर
अवास्तव येत असलेल्या पाण्याच्या बिलासंदर्भात समाधान शिबिरात तक्रार दाखल करताच पाण्याचे बिल तब्बल १२ हजार रुपयांनी कमी करण्यात आल्याचा प्रकार यावेळी उघडकीस आला. याच कारणासाठी पीडित दाम्पत्य गेल्या तीन वर्षांपासून कार्यालयाच्या चकरा मारत होते. परंतु या शिबिराच्या धास्तीमुळे बिल एकदम कमी झाले. ते सुद्धा शिबिराच्या दोन दिवसांपूर्वी रिव्हाईज पाण्याचे बिल त्यांच्या घरापर्यंत आणून देण्यात आले हे विशेष. असे असले तरी अवास्तव पाण्याचे बिलासंदर्भात ठोस कारवाई न करता अधिकाऱ्यांनी केवळ मीटर बदलवण्याचा सल्ला दिला. त्यामुळे या शिबिरातून पीडित दाम्पत्याचे समाधान शेवटी झालेच नाही.
उषा आणि देवानंद धांडे असे या पीडित दाम्पत्याचे नाव आहे. हे दाम्पत्य रमानगर रामेश्वरी चौक येथे राहतात. त्यांना पाण्याचे बिल महिन्याला २५० ते ३०० रुपये या दरम्यान येत होते. ते बिल ते नियमितपणे भरायचे. परंतु २०१२ पासून पाण्याचे बिल अचानकपणे अवाढव्य येऊ लागले. सुरुवातीला काही बिल भरले मात्र जेव्हा २७ हजार रुपये बिल येऊ लागले तेव्हा मात्र त्यांनी याविरुद्ध तक्रार केली. माहितीच्या अधिकारात वाढलेल्या बिलासंदर्भात माहिती मागितली. मात्र महापालिकेच्या जलसंपदाय विभागातर्फे त्यांना बिल वाढीसंदर्भात कुठलेही ठोस कारण सांगण्यात आले नाही. किवा त्यांचे ऐकूनही घेण्यात आले नाही.
त्यांनी याविरुद्ध आपला लढा सुरूच ठेवला. समाधान शिबिराची घोषणा झाली. ते दक्षिण-पश्चिम मतदार संघात येत असल्याने त्यांनी याच मुद्यावर समाधान शिबिरासाठी तक्रार दाखल केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू कार्यालयात त्यांनी अर्ज केला. त्यांना टोकन देण्यात आले. समाधान शिबिराला दोन दिवस शिल्लक असतांना त्यांना आलेल्या २७ हजार रुपयाच्या पाण्याचे बिल तब्बल १२ हजार रुपयांनी कमी करून १५ हजार रुपयाचे रिव्हाईज बिल पाठविण्यात आले.
हे बिल सुद्धा अवास्तव होते. त्यामुळे या दाम्पत्यांनी समाधान शिबिरात महापालिकेच्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे आपली कैफियत मांडली. अवास्तव बिलासंदर्भात त्यांची तक्रार होती. त्यावर ठोस काहीही न करता अधिकाऱ्यांनी केवळ मीटर बदलूून देण्याचा सल्ला दिला.
ज्या मुद्यासाठी आम्ही गेल्या तीन वर्षांपासून भांडत आहोत, तो मुद्दा आजही कायम आहे, त्यामुळे आमचे समाधान झालेले नाही, असे धांडे दाम्पत्यांचे म्हणणे होते.