वासनकर विरोधात तक्रारींचा ओघ
By Admin | Updated: May 13, 2014 01:01 IST2014-05-13T01:01:23+5:302014-05-13T01:01:23+5:30
हजारो ठेवीदारांना शेकडो कोटींचा गंडा घालणार्या वासनकर समूहाविरोधात तक्रारींचा ओघ वाढला आहे.

वासनकर विरोधात तक्रारींचा ओघ
नागपूर : हजारो ठेवीदारांना शेकडो कोटींचा गंडा घालणार्या वासनकर समूहाविरोधात तक्रारींचा ओघ वाढला आहे. आज सकाळपासूनच गुन्हे शाखेत तक्रारकर्त्यांंंनी वासनकरच्या ‘फंडे‘गिरीचा पाढा वाचला. अल्पावधीत दुप्पट, अडीचपट परताव्याचे आमिष दाखवून प्रशांत वासनकर आणि त्याच्या साथीदारांनी हजारो गुंतवणूकदारांकडून शेकडो कोटी रुपये गोळा केले. त्याने दिलेले पोस्टडेटेड चेक बाऊन्स झाल्याने ठेवीदारांमध्ये कुजबूज सुरू झाली. आपली रक्कम परत मागणार्या ठेवीदारांना वासनकरकडून केवळ आणि केवळ आश्वासने मिळत असल्यामुळे त्यांच्यात रोष निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर, विवेक पाठक यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर शुक्रवारी गुन्हा दाखल केला. तेव्हापासून नागपूरच्या आर्थिक क्षेत्रात अन् ठेवीदारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी वासनकर, त्याची पत्नी, भावासह नऊ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. त्यांच्या निवासस्थानी, कार्यालयात, फार्महाऊसमध्ये झडती घेऊन रोख, सोन्याचे दागिने आणि अन्य चीजवस्तूंसह सुमारे ७0 ते ८0 लाखांचा ऐवज जप्त केला. तक्रारकर्त्यांंंनो पुढे या, असे आवाहन पोलिसांनी केल्यामुळे आज सकाळपासूनच अनेक तक्रारकर्ते गुन्हे शाखेच्या कार्यालयात धडकले. रात्रीपर्यंंंत तब्बल डझनभर ठेवीदारांच्या पोलिसांनी तक्रारी नोंदवून घेतल्या तर, तेवढय़ाच ठेवीदारांचे बयान नोंदवून घेतले. पुराव्याची साखळी तयार केली जात आहे. त्यामुळे आणखी काही दिवस त्यांना अटक केली जाणार नाही. मात्र, वासनकर आणि अन्य आरोपींवर पोलीस २४ तास नजर ठेवून आहे, असे गुन्हे शाखेचे आधिकारी सांगत आहेत. (प्रतिनिधी)