वाघांच्या तुलनेत १० हजार चाैरस किमीने घटले वनक्षेत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:08 IST2021-01-17T04:08:38+5:302021-01-17T04:08:38+5:30
निशांत वानखेडे नागपूर : महाराष्ट्र, मध्य प्रदेश व छत्तीसगड या मध्य भारतातील वनक्षेत्राचा विचार केल्यास २०१४ च्या तुलनेत २०१८ ...

वाघांच्या तुलनेत १० हजार चाैरस किमीने घटले वनक्षेत्र
निशांत वानखेडे
नागपूर : महाराष्ट्र, मध्य प्रदेश व छत्तीसगड या मध्य भारतातील वनक्षेत्राचा विचार केल्यास २०१४ च्या तुलनेत २०१८ मध्ये ते ७००० चौरस किमीने वाढले आहे. मात्र, वाघांच्या अधिवसाचा विचार केल्यास ते १०,००० चौरस किमीने कमी झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. सातत्याने वनक्षेत्र घटत असल्याने वाढणारे वाघ राहणार कुठे, हा चिंताजनक प्रश्न आहे. त्यामुळे मानव-वाघ संघर्ष वाढेल, ही भीती व्यक्त केली जात आहे.
नुकत्याच आलेल्या २०१८ च्या अहवालानुसार, देशात वाघांची संख्या दुपटीने वाढल्याची व ती तीन हजारांच्या जवळपास जाणे ही आनंददायक व सकारात्मक बाब आहे. ज्या अहवालात वाघांची संख्या वाढल्याचे नमूद आहे, त्यातच वाघांच्या तुलनेत वनक्षेत्र घटल्याचेही नमूद आहे. वन्यजीव आणि विशेषतः वाघांबाबत अभ्यास करणारे नितीन देसाई यांच्या मते, वाघ हा प्रचंड अनुकूलन क्षमता असलेला प्राणी आहे. म्हणजे कोणत्याही अधिवासात तो स्वतःला सामावून घेतो. त्यामुळे वाघांची संख्या वाढली, हेही एक कारण आहे. मात्र, त्या वाघांना अधिवासही लागतो, हा प्रश्न आहे.
तीन-चार वर्षांपूर्वी बोर अभयरण्यातील वाघिण फिरत फिरत बुटीबोरीच्या कंपनी भागात आली आणि तेथील दाट झाडीत चार पिल्लांना जन्म दिला होता. त्यानंतर ती वाघिण व तिचे पिले कुठे गेली, हा प्रश्न अनुत्तरित आहे. हे एक उदाहरण आहे. देसाई यांच्या मते, वाघ हे समूहाने राहत नाहीत. पिले अडीच वर्षांची होईपर्यंत मादी त्यांना सोबत ठेवते आणि नंतर दूर करते. वाघांना स्वतःचे अधिराज्य असलेले क्षेत्र हवे असते व त्यासाठी त्यांचा आपसातील संघर्ष नवीन नाही. त्यामुळे अनेकदा दूरवर स्थलांतर होते. मात्र, वनक्षेत्र मर्यादित असल्याने हा प्राणी आता चंद्रपूर भागातील झुडपी जंगलातही वास्तव्य करायला लागला आहे. ज्या भागात वाढ झाली आहे, त्या भागात जंगल अपुरे पडत असल्याने ते मानवी वास्तव्य असलेल्या झुडपी जंगलाचा आसरा घेत आहेत. यातून माणसाशी संघर्ष वाढत आहे. त्यामुळे वाघांची संख्या वाढत असल्याने ती किती वाढवावी, त्यावर कसे नियंत्रण मिळवावे आणि समान समायोजन कसे करावे, हा दुसरा प्रश्न त्यातून निर्माण होत आहे, असे स्पष्ट मत नितीन देसाई यांनी व्यक्त केले आहे.
समान समायोजन नाही
वाघ वाढले, पण त्यांचे समान समायोजन नाही. एकीकडे ताडोबा रेंजमध्ये चंद्रपूर, ब्रम्हपुरी भागात संख्या जास्त आहे आणि दुसरीकडे घनदाट जंगल असूनही नागझिरा अभयारण्यात ती तशी वाढली नाही. नितीन देसाई यांच्या मते, वाघ हा 'होम इन्स्टिक्ट' असतो. म्हणजे त्याला चंद्रपुरातून नागझिऱ्यात आणून ठेवले तरी तो आपल्या गृहाकडे परतेल. सर्वसमावेशक प्रयत्नांमुळे वाघ वाढले, पण त्यांच्या अधिवासासाठी सर्वसमावेशक प्रयत्न करण्याची आवश्यकता देसाई यांनी व्यक्त केली.