लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील आघाडीची स्फोटक उत्पादन कंपनी असलेल्या 'सोलार एक्सप्लोजिव्ह 'मध्ये बुधवारी मध्यरात्री झालेल्या भीषण स्फोटात एका सुपरवायझरचा मृत्यू झाला आहे. या घटनेत ४० कामगार जखमी झाले असून, यातील चार कामगार अत्यवस्थ असून, त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.
महामार्गावर नागपूर-अमरावती बाजारगाव नजीकच्या चाकडोह शिवारात असलेल्या 'सोलार एक्सप्लोजिव्ह' मधील 'क्रिस्टलायझेशन' इमारतीत मध्यरात्री १२:३० वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला. तेथे स्फोटकांना तांत्रिक पद्धतीने वाळवून त्यांचे स्फटिकीकरण सुरू होते. तेथे अचानक तापमान वाढले व स्फोट झाला. या स्फोटात मयूर दशरथ गणवीर (२५, रा. चंद्रपूर) याचा मृत्यू झाला. तर सूरज कुमार, निकेश इरपाची, प्रभात जेश्रा, योगेश सिंग हे गंभीर जखमी झाले. रूपाली मुळेकर (अंबाडी), कल्पना धुर्वे (अंबाडी), नीलेश इरपाची (३२, रा. नांदोरा), हिमांशू पंचभाई (२२, रा. नागपूर), सिद्धार्थ डोंगरे (४९, रा. रिधोरा), प्रभात मिश्रा (२७, रा. शिवा), रवींद्र (२५), रोशन फरकाडे (२०, रा. घोतीवाडा), सचिन सरोदे (२५, रा. पांजरा), योगेंद्र सिंग (५१, रा. बिहार), सन्नी कुमार (२५, रा. सोलार कॉलनी), सुरेश डोसेकर (४०, रा. काटोल), अरुण कुमार (२५, रा. सोलार कॉलनी), सूरज बिटने (४०, रा. राहटी, वर्धा), देवीचंद लोखंडे (४९, रा. दुशाला), चंद्रेश बावने (३१, रा. भोपाळ) यांच्यासह ४० कामगार जखमी झाले. यातील ११ जण गंभीर जखमी होते. यातील २९ जणांना किरकोळ जखमा झाल्या होत्या. सर्व जखमी कामगारांना कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून नागपूरला रेफर करण्यात आले.
पोलिसांना बोलवावे लागले, दंगल नियंत्रक पथक
मध्यरात्री स्फोटाचा आवाज ऐकून कामगारांच्या नातेवाईकांनी 'सोलार एक्सप्लोजिव्ह'कडे धाव घेतली. मात्र, प्रवेशद्वार बंद असल्याने आत नेमके काय झाले आहे, याची माहिती मिळत नव्हती. शेकडो लोक तेथे जमा झाले व ते संतप्त झाले होते. स्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये, यासाठी पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार हेदेखील तेथे पोहोचले. तसेच दंगल नियंत्रक पथकाला तेथे पाचारण करावे लागले. पहाटे ३ वाजताच्या सुमारास मृतक मयूर गणवीर याचा मृतदेह सोलार कंपनीच्या मागच्या गेटने काढून उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालय (मेडिकल) येथे पाठविण्यात आला.
'पीएमएक्स १५'ची इमारत नेस्तनाबूत
या स्फोटात आरडीएक्सची स्फोटके वाळवण्याचे काम करणारी पीएमएक्स १५ ही इमारत पूर्णपणे नेस्तनाबूत झाली. याशिवाय हादरा इतका जबरदस्त होता की, इमारतीचे काही पिलर्स व तेथील यंत्रसामुग्री सहाशे ते सातशे मीटर दूर उडून पडली. इमारतीचा मलबादेखील आजूबाजूला उडाला. या स्फोटाचा आवाज १२ किलोमीटर अंतरावरदेखील ऐकू आला. तर अनेक घरांच्या काचादेखील तडकल्या.
कंपनीकडून मृताच्या कुटुंबाला २५ लाख
दरम्यान 'सोलार एक्सप्लोजिव्ह' मधील मृताच्या कुटुंबीयांना कंपनीकडून २५ लाख रुपयांची मदत करण्यात येत असल्याची माहिती कंपनीचे महाव्यवस्थापक सोमेश्वर मुंधडा यांनी दिली. जखमींच्या उपचारांचा खर्चदेखील कंपनी करत असून, रवीनगर येथील दंदे इस्पितळात कंपनीचे प्रतिनिधी रात्रीपासून उपस्थित होते.