आमला पॅसेंजरच्या कोचमध्ये घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 21:46 IST2019-10-02T21:43:06+5:302019-10-02T21:46:13+5:30
आमला पॅसेंजरच्या कोचमध्ये एका व्यक्तीने गळफास घेतल्याची घटना नागपूर रेल्वेस्थानकाच्या वॉशिंग यार्डात बुधवारी दुपारी उघडकीस आली असून या घटनेमुळे रेल्वेस्थानकावर खळबळ उडाली आहे.

आमला पॅसेंजरच्या कोचमध्ये घेतला गळफास
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आमला पॅसेंजरच्या कोचमध्ये एका व्यक्तीने गळफास घेतल्याची घटना नागपूर रेल्वेस्थानकाच्या वॉशिंग यार्डात बुधवारी दुपारी उघडकीस आली असून या घटनेमुळे रेल्वेस्थानकावर खळबळ उडाली आहे.
हरिभाऊ बोरडे (३८) रा. अहमदनगर असे गळफास घेणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेतील पॉईंटमन प्रमोद हे ड्युटीवर असताना बुधवारी दुपारी त्यांना दुर्गंधी आली. प्लॅटफार्म क्रमांक ७ आणि ८ च्या मध्ये वॉशिंग यार्ड आहे. या यार्डात आमला पॅसेंजरचा कोच उभा होता. सीआर ९९४१० या कोचमधून दुर्गंधी आल्यामुळे प्रमोद तिकडे गेला असता हरिभाऊ बोरडे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. त्याने ही माहिती स्टेशन व्यवस्थापक प्रमोद राऊत यांना दिली. राऊत यांनी उपस्टेशन व्यवस्थापक अतुल श्रीवास्तव यांना कळविले. त्यानंतर आरपीएफ आणि लोहमार्ग पोलीस तसेच रेल्वे डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. रेल्वे डॉक्टरांनी मृतदेहाची तपासणी केली. लोहमार्ग पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृताजवळ मिळालेल्या वाहन परवान्यावरून त्याची ओळख पटली. परवान्यावर त्याचे नाव आणि पत्ता होता. संबंधित पत्त्यावर पोलिसांनी संपर्क साधला परंतु संपर्क होऊ शकला नाही. आमला पॅसेंजरचा कोच १४ सप्टेबरला नागपुरात आला. हा कोच दुरुस्तीसाठी ठेवण्यात आला होता. डॉक्टरांच्या मते ४८ तासापूर्वी गळफास घेतला आहे. त्यामुळे मृत नागपुरात कधी आला, त्याने आत्महत्येचा निर्णय का घेतला याचा तपास पोलीस करीत आहेत.