सुट्या पैशांसाठी कमिशनखोरी

By Admin | Updated: November 12, 2016 02:44 IST2016-11-12T02:44:07+5:302016-11-12T02:44:07+5:30

बहिणीच्या उपचारासाठी मध्य प्रदेशातून नागपूरच्या मेडिकलमध्ये आलेल्या अच्युतानंद शाहूला रुग्णालयाच्या परिसरातीलच

Commissions for loose money | सुट्या पैशांसाठी कमिशनखोरी

सुट्या पैशांसाठी कमिशनखोरी

३५ टक्के कमिशन : रुग्णाच्या अगतिकतेचा घेत आहेत फायदा
नागपूर : बहिणीच्या उपचारासाठी मध्य प्रदेशातून नागपूरच्या मेडिकलमध्ये आलेल्या अच्युतानंद शाहूला रुग्णालयाच्या परिसरातीलच औषध विक्रेत्याने सुट्या नोटा नसल्याच्या कारणांवरून ५०० रुपयांची नोट नाकारली. हॉटेलमध्ये काही खाल्ल्यावर सुट्या नोटा मिळतील या आशेने तो एका हॉटेलात गेला असता तेथील मालकाने चक्क ३५ टक्के कमिशन कापून उर्वरित पैसे देण्याची भाषा वापरली. धक्कादायक म्हणजे, रुग्णालयाच्या परिसरात उभ्या असलेल्या आॅटोरिक्षांपासून ते खासगी अ‍ॅम्ब्युलन्स चालक सुट्या पैशांसाठी अडलेल्या रुग्णाच्या अगतिकतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून आले.

५०० आणि १००० रुपयांच्या नोटा मंगळवारच्या रात्रीपासून अचानक बंद झाल्यामुळे देशभरात नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. याचा सर्वाधिक फटका बसत आहे तो गरीब रुग्णांना. बाहेरगावावरून मेडिकलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांना ५० ते १०० असे सुटे पैसे बाळगणे जोखमीचे ठरते, यामुळे अनेक जण १०००, ५०० रुपयांच्या नोटा घेऊनच येतात. परंतु अचानक या नोटा रद्द करण्यात आल्याने आणि मेडिकलने सुट्या नोटा नसल्याचे कारण पुढे करीत ५०० ते १००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास असमर्थता दाखविल्याने शाहू सारखे अनेक रुग्ण अडचणीत आल्याचे चित्र आहे.
‘लोकमत’ प्रतिनिधीकडे आपली आपबिती सांगताना अच्युतानंद शाहू म्हणाला, बहिणीला पाठीच्या कणामध्ये क्षयरोग झाल्याने तिला मेडिकलमध्ये आणले. वॉर्ड क्र. १७ मध्ये ती भरती आहे. बुधवारी डॉक्टरांनी बाहेरून औषध विकत घेऊन आणण्यासाठी चिट्टी दिली. मेडिकलच्या ड्रग स्टोअर्समध्ये गेलो असता त्यांनी सुट्या नोटा नसल्याचे सांगत ५०० रुपयाची नोट नाकारली. रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या हॉटेलमध्ये काही खाल्ल्यावर सुट्या नोटा मिळतील या आशेवर २० रुपयांचा नाश्ता मागवित ५०० रुपयांची नोट दिली. परंतु त्याने नाकारली. ही नोट चलनात नसल्याचे सांगत ३५ टक्के कमिशनवर ३२० रुपये परत देतो असे म्हणून माझ्याच पैशांचा माझ्याशी सौदा केला, असेही तो म्हणाला. विशेष म्हणजे, रुग्णालयाच्या अपघात विभागाच्या परिसरात उभे असलेले काही आॅटोचालक, अ‍ॅम्ब्युलन्स चालकही रुग्णाच्या अगतिकतेचा फायदा घेताना दिसून आले. सुटे पैसे देतो असे सांगून कमी अंतराच्या प्रवासाच्या भाड्यात दुपटीने वाढ केली होती, तर काही जण कमिशनची सर्रास भाषा बोलताना दिसून आले. (प्रतिनिधी)

Web Title: Commissions for loose money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.