व्यावसायिक मार्केट ठरू शकतात ‘हॉटस्पॉट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:21 IST2021-02-20T04:21:27+5:302021-02-20T04:21:27+5:30
नागपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे व्यावसायिक मार्केट ‘हॉटस्पॉट’ ठरण्याची भीती निर्माण झाली आहे. कोरोना रुग्णांचे आकडे दररोज वाढत असल्याने ...

व्यावसायिक मार्केट ठरू शकतात ‘हॉटस्पॉट’
नागपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे व्यावसायिक मार्केट ‘हॉटस्पॉट’ ठरण्याची भीती निर्माण झाली आहे. कोरोना रुग्णांचे आकडे दररोज वाढत असल्याने व्यवसाय ठप्प होण्याची भीती व्यापारी व्यक्त करीत आहेत. व्यापारी कोरोना नियमांचे पालन करून व्यवसाय करीत आहेत, पण ग्राहकांनीही नियम धाब्यावर बसवून खरेदी करण्यास येऊ नये, असे मत विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
कोरोनाच्या रुग्ण वाढीस व्यापाऱ्यांसोबत ग्राहकही कारणीभूत आहेत. कोरोनाचे रुग्ण दरदिवशी वाढत आहेत. गांधीबाग, इतवारी, मस्कासाथ, सीताबर्डी या भागात ग्राहकांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामध्ये मास्क घालणे वा सॅनिटायझरचा उपयोग करण्याचे प्रमाण ग्राहकांमध्ये कमी दिसून येत आहे. याशिवाय रस्त्याच्या कडेला असणारे हातठेले असो वा हॉटेलमध्येही गर्दी वाढली आहे. लग्नसमारंभात ५०० पेक्षा जास्त वऱ्हाडी दिसून येत आहे. केवळ दंड ठोठावल्यापुरती त्यांच्यावर कारवाई नको तर कठोर कारवाई करून आयोजकांना धाक निर्माण झाला पाहिजे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
केवळ बाजारपेठा बंद करून कोरोना थांबणार नाही तर लोकांनीही नियमांचे पालन करून त्यावर प्रतिबंध आणला पाहिजे. कोरोना कायमच गेल्याच्या तोऱ्यात ग्राहक खरेदीसाठी बाजारात येत आहेत. अनेक दुकानदार मास्क लावून दुकानात येण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ग्राहक याकडे कानाडोळा करीत असल्याने अखेर दुकानदारांनाच मास्क देऊन ग्राहकांना खरेदीसाठी आत सोडावे लागत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
लग्नसमारंभात गर्दीचा उच्चांक
गेल्या काही दिवसांपूर्वी लग्नाचे मुहूर्त होते. प्रत्येक लग्नात ५०० पेक्षा जास्त वऱ्हाडी दिसून आले. नागपुरात ५०० पेक्षा जास्त मंगल कार्यालये आणि लॉन असून कारवाई केवळ १५ ते २० जणांवर करण्यात आली. दंड केवळ २ ते ५ हजारांपर्यंत ठोठावण्यात आला. आयोजक दंड देऊन मोकळे झाले, पण लग्नसमारंभ गर्दीतच पार पडले. या गर्दीतून कोरोनाचा प्रसार झाला नाही का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
मास्क व सॅनिटायझर बनले शो पीस
दुकानात केवळ सॅनिटायझर ठेवण्यात आले आहेत, पण त्याचा उपयोग कुणीही करताना दिसत नाही. याशिवाय रेस्टॉरंट वा बार रात्रीपर्यंत सुरू आहेत. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन कुणीच करीत नाही. यावर आळा कोण घालणार, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. कोरोनावर वेळेतच प्रतिबंध आणला नाही तर पुढे ते संकटच ठरणार आहे.
मास्क घालणे बंधनकारक
ग्राहकांनी मास्क घालून दुकान देण्याचे बोर्ड शहरातील सर्व किराणा दुकानदारांना लावण्यास सांगितले आहे. मास्क घालून येणाऱ्यांनाच किराणा वस्तू देण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतरही ग्राहक मास्क घालून येत नाहीत. लोकांमध्ये कोरोनाची भीती नसल्याचे दिसून येत आहे. दुकानदार काळजी घेतो, पण ग्राहकांनीही स्वस्त: दक्ष राहावे.
प्रभाकर देशमुख, अध्यक्ष, नागपूर चिल्लर किराणा असोसिएशन.
गांधीबाग व इतवारी बाजारात ग्राहकांची गर्दी
लग्नसमारंभामुळे नागपुरातील मुख्य बाजारपेठ गांधीबाग आणि इतवारीत ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. ग्राहक कुटुंबीयांसोबत खरेदीला येत आहेत. त्यामुळे कोरोनाचे संकट वाढले आहे. लोकांना मास्क घालण्याचे आवाहन केल्यानंतरही कुणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. कोरोना वाढल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार आहे.
अजय मदान, गांधीबाग होलसेल क्लॉथ मर्चंट असोसिएशन.
इतवारीतील गर्दी कमी व्हावी
इतवारी मुख्य बाजारपेठ असल्याने ठोक आणि किरकोळ ग्राहकांची गर्दी दररोज असते. दुकानदार मास्क आणि सॅनिटायझरबाबत दक्ष असतात. पण ग्राहक त्याकडे कानाडोळा करतात. या बाजारात प्रशासनाने अनेकदा कारवाई केली आहे. त्यानंतरही होणारी गर्दी चिंतेची बाब आहे. कोरोना पुन्हा वाढल्यास व्यवसायावर परिणाम होणार आहे.
शिवप्रताप सिंह, नागपूर इतवारी किराणा मर्चंट असोसिएशन.