व्यावसायिक ६० रुपये तर घरगुती सिलिंडर पाच रुपयांनी महाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 23:12 IST2019-04-03T23:02:00+5:302019-04-03T23:12:43+5:30
गॅस कंपन्यांनी एप्रिल महिन्यात ग्राहकांना महागाईचा झटका दिला आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये उपयोगात येणाऱ्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ६० रुपये तर घरगुती सिलिंडरच्या किमतीत पाच रुपयांची वाढ झाली आहे.

व्यावसायिक ६० रुपये तर घरगुती सिलिंडर पाच रुपयांनी महाग
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गॅस कंपन्यांनी एप्रिल महिन्यात ग्राहकांना महागाईचा झटका दिला आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये उपयोगात येणाऱ्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ६० रुपये तर घरगुती सिलिंडरच्या किमतीत पाच रुपयांची वाढ झाली आहे.
मार्च महिन्यात १९ किलो भरतीच्या सिलिंडरची किंमत १३४२ रुपये होती. त्यात वाढ होऊन भाव १४०२ रुपयांवर पोहोचले. त्यात प्रति सिलिंडर ६० रुपयांची वाढ झाल्यामुळे व्यावसायिकांना झटका बसला आहे. नागपुरात दरदिवशी जवळपास एक हजार व्यावसायिक सिलिंडर आणि १० हजारांपेक्षा जास्त घरगुती सिलिंडरची विक्री होते, हे विशेष. घरगुती सिलिंडर पाच रुपयांनी महाग झाले आहे. मार्च महिन्यात १४.२ किलो सिलिंडरचे दर ७३७.५० रुपये होते. दरवाढ होऊन भाव ७४२.५० रुपयांवर पोहोचले आहे. गॅस एजन्सीचे डिलेव्हरी बॉय सिलिंडर घरी पोहोचवून देण्याच्या नावावर २० रुपये अतिरिक्त मागणी करतात. त्यामुळे ग्राहकांना सिलिंडर महागच खरेदी करावे लागते. मार्च महिन्याच्या २४३.०३ रुपयांच्या तुलनेत सबसिडीची जास्त रक्कम ग्राहकांच्या खात्यात जमा होणार आहे.