मदतीला धावून येणारा - आपुलकी जपणारा...
By Admin | Updated: October 31, 2014 00:46 IST2014-10-31T00:46:48+5:302014-10-31T00:46:48+5:30
युवा नगरसेवक, युवा महापौर व उद्या, शुक्रवारी शपथविधीनंतर युवा मुख्यमंत्री होणारे देवेंद्र फडणवीस यांची कर्मभूमी नागपूर. या भूमीत फडणवीस यांना अनेकांच्या राजकीय विरोधाला सामोरे जावे लागले.

मदतीला धावून येणारा - आपुलकी जपणारा...
कुणी सोबत क्रिकेट खेळले, तर कुणी टिफ ीन शेअर केले
नागपूर : युवा नगरसेवक, युवा महापौर व उद्या, शुक्रवारी शपथविधीनंतर युवा मुख्यमंत्री होणारे देवेंद्र फडणवीस यांची कर्मभूमी नागपूर. या भूमीत फडणवीस यांना अनेकांच्या राजकीय विरोधाला सामोरे जावे लागले. पण राजकारणा पलीकडे जात त्यांनी व्यक्तिगत संबंध जपले. फडणवीस यांच्याशी कुणी लहानपणी क्रिकेट खेळले आहेत, तर कुणी रेल्वेत टिफीन शेअर केले आहेत. चांगल्या कामासाठी फडणवीस यांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून पाठबळ दिल्याचीही उदाहरणे आहेत. त्यामुळे राजकीय विरोधकांनाही फडणवीस आपलेसे वाटतात.
प्रशासकीय बदल्यांचे समर्थन
एक दुसऱ्यांना सोबत घेऊन चाललो आहे. पश्चिम महाराष्ट्रातील लोक एकत्र येतात तर आपणही विदर्भासाठी एकत्र यावे, यासाठी फडणवीस यांचा आग्रह असायचा. विदर्भ विकासाच्या बैठकीत आम्ही एकत्र असायचो. ते आमचे चांगले मित्र आहेत. त्यांच्या पत्नी आमच्या अनेक कार्यक्रमांना अतिथी म्हणून उपस्थित राहिल्या आहेत. मी मंत्री असताना पशुसंवर्धन विभागाच्या पश्चिम महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या बदल्या विदर्भात केल्या होत्या. त्याला अनेकांनी विरोध केला. पण फडणवीस यांनी मात्र समर्थन केले. मला पाठबळ दिले. रेल्वेत अनेकदा सोबत प्रवास केला. आम्ही टिफीन शेअर केले. त्यांनी सुचविलेली कामे मी करून दिली. त्यांनीही आमची चार कामे केली. फडणवीस पॉझिटिव्ह अॅटिट्यूडचा माणूस आहे.
- अनिस अहमद, माजी मंत्री
रेल्वेत टिफीन शेअर केले
गंगाधरराव फडणवीस आणि भाऊसाहेब मुळक दोघेही चांगले मित्र होते. दोघेही सोबत आमदार होते. दोघांच्या रुम मॅजेस्टिक होस्टेलला आमोरासमोर होत्या. त्यामुळे वडिलांसोबत देवेंद्र व मी रेल्वेत अनेकदा सोबत आलो. एकमेकांचे टिफीन खायचो. मस्ती करायचो. तेव्हापासून आमची मैत्री आहे. कालांतराने ते महापौर झाले. नगरसेवक म्हणून काम करताना नेहमी घरी यायचे. त्यांचे वडील गेटवरूनच म्हणायचे छत्रपती कुठे आहे? देवेंद्र सोबत असायचा. मी मंत्री झालो त्यावेळी देवेंद्र स्वत:हून घरी आला व माझे अभिनंदन केले. पहिल्यांदा नागपूरचा मुख्यमंत्री झाला आहे. त्याने विदर्भासाठी भरीव काम करावे. एक जुना मित्र म्हणून देवेंद्रला खूप खूप शुभेच्छा.
- राजेंद्र मुळक, माजी राज्यमंत्री
सोबत क्रिकेट खेळलो
नुकतेच माझ्या घरी गणपतीच्या जेवणासाठी फडणवीस आले होते. ते आल्याचे पाहून मी त्यांना घरात दर्शनासाठी नेण्यासाठी पुढे सरसावलो. तेव्हा ते म्हणाले, विकास मला तुझ्या घरचे लोक ओळखतात. तू इथेच गेटवर थांबून येणाऱ्यांचे स्वागत कर. मी आत जाऊन दर्शन करतो. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असलेला तो काळ होता. अशावेळी राजकीय व्यक्तीने विरोधकाच्या घरी लावलेली हजेरीही बरेच वादळ उठवू शकते. पण देवेंद्रने त्याची कधीच पर्वा केली नाही. आम्ही सोबत क्रिकेट खेळलो आहोत. माझी पहिली निवडणूकही मी देवेंद्रच्याच विरोधात लढतो होतो. एकदा आमदारकीही लढलो. पण राजकारणापलीकडील आमची मैत्री आहे.
- विकास ठाकरे, शहर अध्यक्ष, काँग्रेस