आषाढीनिमित्त रंगला विठुनामाचा गजर
By Admin | Updated: July 16, 2016 03:07 IST2016-07-16T03:07:19+5:302016-07-16T03:07:19+5:30
आषाढी एकादशीला श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी चंद्रभागेच्या तीरी लाखो भक्तांचा मळा फुलला आहे.

आषाढीनिमित्त रंगला विठुनामाचा गजर
संगीत कला अकादमीचे आयोजन : अजित कडकडेंच्या भक्तिरसाने श्रोते भारावले
नागपूर : आषाढी एकादशीला श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी चंद्रभागेच्या तीरी लाखो भक्तांचा मळा फुलला आहे. पंढरपूरच्या या भक्तिरसाचे सूर दूरवर नागपूरलाही ऐकायला मिळत आहेत. आषाढीच्या पूर्वसंध्येला सायंटिफिक सभागृहात विठुनामाचा गजर रंगला होता. प्रसिद्ध शास्त्रीय गायक अजित कडकडे यांच्या स्वरांनी वातावरण भक्तिमय झाले.
संगीत कला अकादमी व विठोबा दंतमंजन समूहातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सुपरिचित गायक विनोद वखरे यांनी संकल्पित केलेले २१ अभंग व भक्तिगीते या कार्यक्रमात सादर करण्यात आली. ‘जय जय रामकृष्ण हरि...’ या पांडुरंगाच्या नामगजराने विनोद वखरे यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली. ‘हरि म्हणा तुम्ही गोविंद म्हणा..., कानडा राजा पंढरीचा..., माझे माहेर पंढरी..., तुझे रुप चित्ती राहो...’ असा रागसंगीताचा स्वरमेळा श्रोत्यांच्या कानात स्थिरावला. ‘भेटी लागी जीवा..., पांडुरंग कांती..., ये ग ये ग विठाबाई..., अजी मी ब्रह्म पाहिले..., रुप पाहता लोचनी..., बोलावा विठ्ठल..., अवचिता परिमळु...’ या भक्तिगीतांनी श्रोत्यांचे तनमन हरवले.
अजित कडकडे यांचा खास चाहता वर्ग दूरवर पसरला आहे. त्यांचे शास्त्रीय स्वरातून रसाळ अभंग गायन श्रोत्यांना भक्तिरसात सुखावणारे आहे. त्यामुळे अभंगसम्राट म्हणूनही त्यांची ख्याती आहे. श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. ‘विठुराया माझा चंदनाचा कंद..., अबीर गुलाल..., जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले..., वृंदावनी वेणू...’ असे त्यांचे रसाळ सादरीकरण. मुळात त्यांचा गाजदार आवाज, त्यात अर्थभावपूर्ण अभंग व या सादरीकरणाला असलेले शास्त्रीय राग संगीताचे रेशमी अस्तर यामुळे श्रोते त्यांच्या कार्यक्रमाचे खास आतुरतेने वाट पाहतात. विनोद वखरे यांच्यासह श्रुती चौधरी, सीमा दामले या प्रतिभावंत गायकांनीही त्यांना तोलामोलाची साथ दिली. भक्तिरसाच्या या अभंगवारीत गोविंद गडीकर, अरविंद उपाध्ये, श्रीकांत पिसे, मोरेश्वर दहासहस्र, विक्रम जोशी, श्रीधर कारडे यांनी संगीताची साथसंगत केली. यावेळी कार्यक्रमाला आमदार अनिल सोले, नगरसेवक गोपाल बोहरे, योगाचार्य शशिकांत जोशी, विठोबा समूहाचे संचालक मनिष शेंडे, कार्तिक शेंडे, सुदर्शन शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन स्मिता खनगई यांनी केले.(वा.प्र)