कॉलेज सुरू, निकाल अडले!
By Admin | Updated: July 2, 2015 03:14 IST2015-07-02T03:14:47+5:302015-07-02T03:14:47+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे.

कॉलेज सुरू, निकाल अडले!
कुलगुरूंचे आश्वासन हवेतच विरले : अंतिम वर्षाचे निकाल नाहीच
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल दोन ते तीन दिवसांत लावण्यात येतील, असे आश्वासन सुमारे आठवडाभराअगोदर कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी दिले होते. परंतु अद्यापदेखील विद्यापीठाचे निकाल लागलेले नसून विद्यापीठाकडून महाविद्यालयांवर याचे खापर फोडण्यात येत आहे.
शैक्षणिक सत्र सुरू झाले असले तरी उन्हाळी परीक्षांच्या निकालांची गाडी अतिशय संथ वेगाने सुरू आहे. मागील मंगळवारी यासंदर्भात परीक्षा विभागात बैठक झाली. अनेक महाविद्यालयांनी प्रात्यक्षिक परीक्षा व अंतर्गत मूल्यमापनाचे गुण विद्यापीठाला पाठविलेलेच नसल्याची बाब समोर आली. कमीतकमी अंतिम वर्षाचे निकाल परीक्षा विभागाने लवकरात लवकर लावावेत व ज्यांची प्रात्यक्षिक परीक्षा तसेच अंतर्गत मूल्यमापनाचे गुण आलेले नाहीत त्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे निकाल ‘विथहेल्ड’मध्ये ठेवावेत, असे निर्देश कुलगुरूंनी दिले होते. अवघ्या २० महाविद्यालयांमुळे ‘बीएस्सी’च्या सर्व विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित आहेत. कला व वाणिज्यच्या निकालाची ‘स्क्रूटिनी’ राहिली होती. ती आता झाली असून लवकरात लवकर निकाल लावण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले होते. परंतु आठवडा उलटूनही अंतिम वर्षांचे निकाल अद्याप लागले नाहीत. (प्रतिनिधी)
ही कुठली समाधानकारक स्थिती
९५६ पैकी अवघ्या २५० परीक्षांचे निकाल आतापर्यंत जाहीर झाले आहेत. परीक्षा विभाग कोलमडलेला असताना कुलगुरू मात्र ते मान्य करायला तयार नाहीत. मागील आठवड्यात त्यांना याबाबत विचारणा केली असता निकालाची स्थिती समाधानकारक असून, जाहीर झालेल्यांपैकी ७५ टक्के निकाल ४५ दिवसांच्या आत लावण्यात आले आहेत, असा दावा त्यांनी केला होता. परंतु हजारो विद्यार्थ्यांचे निकाल रखडलेले असताना कुलगुरूंना ही स्थिती समाधानकारक कशी वाटते, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
उच्च शिक्षणाची संधी जाण्याची भीती
अंतिम वर्षांच्या अनेक विद्यार्थ्यांना बाहेरील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा आहे. अनेक विद्यापीठांमध्ये प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशा स्थितीत निकालच लागले नाही तर प्रवेशाची संधी जाते की काय अशी भीती विद्यार्थ्यांना वाटत आहे. निकाल लवकर लावण्याचे दावे दरवेळा करण्यात येतात, परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी कधीच का होत नाही, असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे.