गोवारी शहीद स्मारकाची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल
By Admin | Updated: November 18, 2015 03:21 IST2015-11-18T03:21:26+5:302015-11-18T03:21:26+5:30
गोवारी शहीद स्मारकाच्या दुरवस्थेचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर, जिल्हाधिकारी कार्यालयाने त्याची दखल घेऊन,

गोवारी शहीद स्मारकाची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल
नागपूर : गोवारी शहीद स्मारकाच्या दुरवस्थेचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर, जिल्हाधिकारी कार्यालयाने त्याची दखल घेऊन, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे यांच्या अध्यक्षतेत बैठक घेण्यात आली. या बैठकीला महापालिका, नागपूर सुधार प्रण्यास, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सहभागी करण्यात आले होते. शहीद स्मारकातील तुटलेल्या वस्तू्ंची डागडुजी करण्याचे, विद्रुप झालेल्या वस्तूंना रंगरंगोटी क रण्याच्या सूचना कुंभारे यांनी दिल्या.
२३ नोव्हेंबरला शहीद गोवारी स्मारकावर श्रद्धांजलीचा शासकीय कार्यक्रम घेण्यात येतो. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गोवारी बांधव नागपुरात येऊन, श्रद्धास्थानाचे दर्शन घेतात. २२ नोव्हेंबरपूर्वी स्मारकाचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन कुंभारे यांनी दिले. गोवारी स्मारकाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी मुख्यमंत्र्यांच्या साहाय्यता निधीतून निधी उपलब्ध होतो. गेल्या पाच वर्षापासून स्मारकासाठी निधीच उपलब्ध झाला नाही. यासंदर्भात आदिवासी गोवारी समाज संघटनेतर्फे स्मारकासाठीच निधी जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ मिळावा, यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. बैठकीला संघटनेचे कैलास राऊत, नारायण सहारे, रणवीर नेवारे, मारोती काळसर्पे, जयदेव राऊत, शेखर लसुंते, शरद सहारे, प्रभू काळसर्पे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)