जिल्हाधिकाऱ्यांनी केली ‘ऑन दि स्पाॅट’ पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:08 IST2021-04-04T04:08:59+5:302021-04-04T04:08:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी उमरेड येथील वेगवेगळ्या हॉटेलवर ‘ऑन दि स्पॉट’ पोहोचत शुक्रवारी (दि.२) ...

जिल्हाधिकाऱ्यांनी केली ‘ऑन दि स्पाॅट’ पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी उमरेड येथील वेगवेगळ्या हॉटेलवर ‘ऑन दि स्पॉट’ पोहोचत शुक्रवारी (दि.२) रात्री ९ वाजताच्या सुमारास पाहणी केली. या बेधडक कारवाईमध्ये एकूण आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या या कारवाईमुळे उमरेड तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीच्या निष्क्रिय कार्यप्रणालीचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
सावजी तडका, हॉटेल डी-मर्सी, डायनिंग आऊट, वाघमारे फॅमिली रेस्टॉरंट, हरिओम शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंट, भूमी रेस्टॉरंट, हॉटेल लज्जत, हॉटेल मी मराठी आणि रेस्टॉरंट या आठ हॉटेलच्या मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात तहसील कार्यालय, नगर परिषद व पोलीस स्टेशन उमरेड यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. कारवाईमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नागरिकांच्या तक्रारी असूनसुद्धा कारवाई होत नसल्याचा आरोप होत असून, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री ९ वाजताच्या सुमारास पहिली कारवाई केली. भिवापूर येथून नागपूरला परतीच्या मार्गावर असताना त्यांनी सामान्य नागरिक बनत आधी विचारणा केली. अशावेळी एकमेकांकडे बोट दाखवित काही हॉटेलमालकांच्या उडवाउडवीच्या उत्तरानंतर आणि मुजोरीमुळे लागलीच त्यांनी तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावले.
रात्री ८ नंतर हॉटेल कसे काय सुरू आहे. आपले लक्ष कुठे असते, अशा शब्दात जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. कलम १८८, २६९ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१, साथरोग प्रतिबंध कायदा १८९७ चे कलम ३ अन्वये उमरेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कारवाई पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे करीत आहेत.
....
यांच्यावर कारवाई कधी?
उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्याला खेटून असलेल्या रिसोर्टमध्येसुद्धा चक्क पाचशे-हजार वऱ्हांड्याच्या उपस्थितीत शुभमंगल होत असल्याची ओरड सुमारे दोन-तीन महिन्यापासून सुरू आहे. यासाठीसुद्धा काही स्थानिक मंगल कार्यालय चालकांनी तहसीलदार प्रमोद कदम यांच्याकडे ही बाब सांगितली. अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कारवाई कधी करणार, असा सवाल विचारला जात आहे.
....
आधी केली चर्चा
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी नगरपालिकेच्या सभागृहात शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. कठोर कारवाई करा, असे निर्देशही दिले. त्यानंतरही फारसे कुणी गांभीर्याने घेतले नाही. तहसीलदार प्रमोद कदम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप धरमठोक, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. एन. खानम, पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी जयसिंग जाधव आदींची यावेळी उपस्थिती होती. नगराध्यक्ष विजयलक्ष्मी भदोरिया यांनीही काही प्रश्न-समस्यांकडे लक्ष वेधले. या चर्चेनंतर जिल्हाधिकारी भिवापूरकडे रवाना झाले.