नागपूर : दाेन दिवसापासून तापमानाची घसरण सुरू असून नागपूरसह विदर्भात थंड लाटेची स्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी विदर्भात नागपूर शहर सर्वात थंडगार ठरले. रात्रीचा पारा पुन्हा ३ अंशाने घसरत ८.२ अंशावर पाेहचला. थंडगार वाऱ्यामुळे नागपूरकरांना बाेचऱ्या थंडीची जाणीव हाेत आहे. दुसरीकडे कमाल पारा सरासरीच्या खाली असल्याने दिवसासुद्धा थंडी जाणवत आहे.
उत्तर भारतातील बहुतेक राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून जबरदस्त थंडी वाढली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात विदर्भात वाढलेली थंडी कमी झाली हाेती. पारा १७ अंशापर्यंत पाेहचला हाेता. मात्र त्यानंतर पुन्हा गारठा वाढला. हवामान विभागाने या आठवड्यात थंडी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला हाेता. त्यानुसार साेमवार ६ जानवारीपासून विदर्भाच्या किमान तापमानात घसरणीचे सत्र सुरू झाले. बुधवारी नागपूरचा पारा १०.२ अंशावर हाेता, जाे २४ तासात २ अंशाने घसरत ८.२ अंशावर आला. किमान तापमान सरासरीपेक्षा ४ अंशाने कमी आहे.
नागपूरशिवाय गाेंदिया येथे ८.४ व चंद्रपूरच्या ब्रम्हपुरीत तापमान ८.५ अंशावर घसरले आहे. वर्धासुद्धा ९.६ अंशावर आहे. त्यानंतर इतर बहुतेक शहरे १० अंशावर आहेत. मात्र थंड वाऱ्यामुळे थंडीची तीव्रता तापमानाच्या तुलनेत अधिक वाटत आहे. ही बाेचरी थंडी आणखी दाेन दिवस त्रास देण्याची शक्यता आहे.