तळपत्या उन्हात ड्युटी करणाऱ्या पोलिसांना ‘तो’ देतो थंड पन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 10:32 AM2019-05-14T10:32:11+5:302019-05-14T10:35:08+5:30

उन्हातान्हात उभे राहून ड्युटी बजावणाऱ्या पोलीस दादांसाठी एका संवेदनशील माणसाने थंडगार पन्हे पाजून थंडावा देण्याचा प्रयत्न चालविला आहे. अशोक खंडेलवाल असे या पोलीस सेवादाराचे नाव आहे.

Cold drinks give 'Police' to who are servicing in the heat | तळपत्या उन्हात ड्युटी करणाऱ्या पोलिसांना ‘तो’ देतो थंड पन्हे

तळपत्या उन्हात ड्युटी करणाऱ्या पोलिसांना ‘तो’ देतो थंड पन्हे

Next
ठळक मुद्देपोलीस दादांच्या सेवेत अशोक खंडेलवाल चार वर्षांपासून सेवाकार्य

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उन्ह चांगलेच तापायला लागले आहे. कडक उन्हाने प्रत्येकाच्या अंगाची लाहीलाही होत आहे. मात्र या कडक उन्हात पोलीस कर्मचाऱ्यांना भर चौकात उभे राहून ड्युटी करावी लागत आहे. चौकात कधी सावलीचा आसरा मिळतो तर कधी उन्हातच उभे राहावे लागते. असे उन्हातान्हात उभे राहून ड्युटी बजावणाऱ्या पोलीस दादांसाठी एका संवेदनशील माणसाने थंडगार पन्हे पाजून थंडावा देण्याचा प्रयत्न चालविला आहे. अशोक खंडेलवाल असे या पोलीस सेवादाराचे नाव आहे.
आकाशात सूर्य आग ओकत असल्याने जमिनीवर जीवांची होरपळ होत आहे. अशा समयी अनेक संवेदनशील माणसे, संस्था, संघटना आपापल्या परीने गरजवंतांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कुठे पाणपोई, कुणी गरजूंना चप्पल, दुपट्टे वाटप करीत आहेत. यातच अशोक खंडेलवाल यांनी उन्हात ड्युटी बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सेवेचे कार्य स्वीकारले आहे. खंडेलवाल हे एका बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. दररोज त्यांचा हा नित्यक्रम ठरला आहे. सकाळी ८ वाजतापासून घरी पन्हे बनविण्याचे काम सुरू होते. त्यांची पत्नी पौर्णिमा याही त्यांच्या कार्यात सहभागी होतात. मुबलक पन्हे बनविले की ८-१० मोठ्या बॉटल्समध्ये भरून ते घरून निघतात. त्यांचे घर असलेल्या लिबर्टी सिनेमाच्या चौकापासून त्यांचे कार्य सुरू होते. पुढे एलआयसी चौक, मॉरिस कॉलेज टीपॉर्इंट, लोहा पूल, सीताबर्डी चौक, व्हेरायटी चौक व झाशी राणी चौक येथे जातात. कधी जपानी गार्डन चौक तर कधी पागलखाना अशी त्यांची फिरस्ती सुरू असते.
खंडेलवाल २०१५ मध्ये बँकेतून निवृत्त झाले. २०१६ ची एक घटना हा उपक्रम सुरू करण्याला कारणीभूत ठरली. भर दुपारी एकदा बॉटलमध्ये पन्हे भरून ते घराबाहेर पडले होते. त्यावेळी संविधान चौकात कुठला तरी मंत्री या मार्गाने जाणार असल्याने एक शिपाई त्याठिकाणी तैनात होते. खंडेलवाल यांनी त्याला स्वत:जवळचे पन्हे घेण्याचाआग्रह केला. ते घेतल्यानंतर आणखी पन्ह्याची मागणी केली. हा अनुभव समाधानकारक होता. तेव्हापासून त्यांनी पोलिसांना पन्हे वितरणाचा सेवाभाव सुरू केला. दरवर्षी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात त्यांचे हे सेवाकार्य सुरू होते व चौकाचौकात जाऊन ते पोलिसांची तहान शमवितात. गेल्या चार वर्षापासून त्यात खंड पडला नाही. त्यांचे नातवंडही या सेवाकार्यात सहभागी होतात. चौकातील पोलीसही दररोज त्यांची वाट पाहतात व अधिकारवाणीने ‘आज आप लेट हो गये’, असे म्हणतात. हे कार्य इतरांनीही सुरू करावे, हीच माणुसकी आहे, अशी भावना व्यक्त करीत अशोक खंडेलवाल पुढच्या चौकाकडे रवाना होतात.

Web Title: Cold drinks give 'Police' to who are servicing in the heat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.