कोकेनने आणली पोलिसांना गुंगी
By Admin | Updated: April 8, 2016 02:51 IST2016-04-08T02:51:19+5:302016-04-08T02:51:19+5:30
गुन्हे शाखेने जप्त केलेले ‘ते’ पावडर म्हणजे कोकेन नव्हे तर भलतेच दुसरे काही आहे, असा अभिप्राय मुंबईतील प्रयोगशाळेच्या तज्ज्ञांनी दिल्यामुळे पोलिसांना जबर झटका बसला आहे.

कोकेनने आणली पोलिसांना गुंगी
ते कोकेन नव्हे : मुंबई प्रयोगशाळेच्या तज्ज्ञांचा निर्वाळा
नागपूर : गुन्हे शाखेने जप्त केलेले ‘ते’ पावडर म्हणजे कोकेन नव्हे तर भलतेच दुसरे काही आहे, असा अभिप्राय मुंबईतील प्रयोगशाळेच्या तज्ज्ञांनी दिल्यामुळे पोलिसांना जबर झटका बसला आहे. नव्हे, तर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई म्हणून पोलिसांनी गाजावाजा केलेल्या कोकेन प्रकरणाने तज्ज्ञांच्या अहवालानुसार नाट्यमय वळण घेतल्याने पोलिसांना गुंगी येण्याची वेळ आली आहे.
पवनशक्तीनगरातील पवन रामभाऊ रावळे (वय ३३), तुषार मधुकर हांडे (वय २२, रा. श्रवणनगर) आणि महेंद्र तुळशीराम लाकुडकर (वय ३०, रा. राजेंद्रनगर) या तिघांना पकडून १५ मार्चला गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्याकडून ६० लाखांचे कोकेन जप्त केले होते. अंमली पदार्थ पकडण्याची आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्यामुळे पोलिसांचीही प्रसारमाध्यमांनी चांगलीच प्रशंसा केली होती.
दरम्यान, उपरोक्त आरोपींना अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली. त्यांचा पीसीआर घेतला. हे कोकेन कुठून आणले, कुणाला खेप जाणार होती, कोण कोण या धंद्यात आहे, कुठे आणि कुणाशी या कोकेनचे धागेदोरे आहे, ते शोधण्यासाठी पोलिसांनी उपरोक्त आरोपींना चांगलेच गरम केले. मात्र, अपघाताने ‘त्या’ पावडरचा डबा हाती लागल्याचे आरोपी सांगत होते. एका-दोघांनी ते पावडर चाखल्यानंतर गुंगी (नशा) आल्यामुळे ते कोकेन किंवा गर्द असावे, असा अंदाज बांधून आरोपींनी ते विकण्याचा प्रयत्न केला; मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी त्यांना अटक केली.
काही हौशी मंडळींनी या कोकेनच्या बाजारपेठेपासून आरोपीच्या नेटवर्कपर्यंतचे स्वत:च्याच मनाने धागेदोरे विणले. दरम्यान, तज्ज्ञांच्या अहवालानुसार कोकेन प्रकरणाला नाट्यमय कलाटणी मिळाल्याने पोलीस आता कोणती भूमिका वठविणार, हे विचारण्यासाठी संबंधित वरिष्ठांशी संपर्क केला असता अनेकांनी फोन उचलण्याचे टाळले. हे प्रकरण गुन्हेशाखेसाठी अडचणीचे ठरू शकते, अशी चर्चा मात्र रात्री पोलीस खात्यातून ऐकू येत होती. (प्रतिनिधी)
कथित आरोपींचे काय ?
दरम्यान, पोलिसांनी कोकेन म्हणून जप्त केलेले हे पांढरे पावडर रासायनिक परीक्षणासाठी मुंबईच्या शासकीय प्रयोगशाळेत पाठविले होते. तीन आठवड्यानंतर आता तेथील तज्ज्ञांनी हे ‘कोकेन’ नव्हे, असा निर्वाळा दिला. त्यामुळे शहर पोलिसांना जबर हादरा बसला आहे. आरोपींची एकूणच पार्श्वभूमी लक्षात घेता, ‘ते’ बदलाबदलीसारखा एवढा मोठा प्रताप करू शकत नाही, हे ध्यानात आल्याने कोकेन जप्त केल्याचा दावा करणाऱ्या पोलिसांनाच आता गुंगी येण्याची वेळ आली आहे. दरम्यान, कोकेनच्या आरोपात पकडलेल्या ‘त्या’ कथित आरोपींबाबत आता पोलीस कोणती भूमिका घेणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.