कोब्राच्या विषाची तस्करी पकडली
By Admin | Updated: March 22, 2017 02:58 IST2017-03-22T02:58:57+5:302017-03-22T02:58:57+5:30
कोब्रासारख्या खतरनाक सापाच्या जहाल विषाची तस्करी करणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली.

कोब्राच्या विषाची तस्करी पकडली
दोघांना अटक : लाखोंचे विष अन् कार जप्त
नागपूर : कोब्रासारख्या खतरनाक सापाच्या जहाल विषाची तस्करी करणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून लाखोंचे विष आणि इनोव्हा कार जप्त केली. रोशन गिरीधर अमृतवार (वय १९) आणि गोपालसिंग रेनसिंग गौर (वय ३३)अशी या दोघांची नावे आहेत. रोशन तळोधी बाळापूर (नागभिड, जि. नागपूर) आणि गौर हुडकेश्वर (नागपूर) येथील रहिवासी आहे. साप आणि त्याच्या विषाची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटसोबत या दोघांचे संबंध असल्याचा संशय आहे.
हिंगण्याच्या नोगा कंपनीजवळ पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार (एमएच ३१/ सीव्ही ७३१९) बराच वेळेपासून उभी असल्यामुळे एमआयडीसी पोलिसांना संशय आला. त्यांनी कारमध्ये बसलेल्या रोशन आणि गौर यांना विचारपूस करताच ते असंबंध उत्तरे देऊ लागले. त्यामुळे त्यांच्यावरील संशय बळावला. पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यात छोट्या बॉटल्स (टेस्ट ट्यूब बॉटल) मध्ये विशिष्ट द्रव भरून दिसले. त्याबाबत पोलिसांनी या दोघांना विचारणा केली असता त्यात सापाचे विष असल्याचे त्यांनी सांगितले. हे विष विकायला आणल्याचीही आरोपींनी कबुली दिली. त्यामुळे ठाणेदार सुनील महाडिक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक रमेश तायडे, हवलदार पप्पू यादव, दिनेश जुगनाके, सुशील श्रीवास्तव आणि आशिष दुवे यांनी या दोघांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्यांची रात्रभर चौकशी केल्यानंतर प्रकरण वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या अख्त्यारितील असल्याचे लक्षात आल्यामुळे या दोघांना वनाधिकाऱ्यांच्या हवाली करण्यात आले. (प्रतिनिधी)