विहिरीत आढळला कोळसा
By Admin | Updated: May 14, 2016 02:54 IST2016-05-14T02:54:00+5:302016-05-14T02:54:00+5:30
नरखेड तालुक्यातील अंबाडा (सायवाडा) शिवारातील एका शेतात विहिरीचे खोदकाम करीत असताना २१ फूट खोलीवर कोळशाचा थर आढळून आला.

विहिरीत आढळला कोळसा
अंबाडा शिवारातील विहीर : कोळसा खाण असल्याचे संकेत
नरखेड/जलालखेडा : नरखेड तालुक्यातील अंबाडा (सायवाडा) शिवारातील एका शेतात विहिरीचे खोदकाम करीत असताना २१ फूट खोलीवर कोळशाचा थर आढळून आला. त्यामुळे या प्रकाराची माहिती महसूल विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आली. परिणामी, या परिसरात कोळशाची खाण असल्याचे संकेत मिळत असून, याला महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.
दादाराव शंकरराव सोनारे रा. अंबाडा, ता. नरखेड यांनी त्यांच्या अंबाडा शिवारातील शेतात (सर्व्हे क्रमांक - २९०/१) मध्ये नुकतेच विहिरीच्या खोदकामाला सुरुवात केली. सदर खोदकाम २१ फुटापर्यंत गेले असता, कोळशाचा थर आढळून आला. त्यामुळे सोनारे यांनी या प्रकाराची माहिती तलाठी राहुल राऊत यांच्यामार्फत नायब तहसीलदार दिनेश निंबाळकर यांना दिली. निंबाळकर यांनी याची माहिती लगेच उपविभागीय अधिकारी (महसूल) अविनाश कातडे यांना देत गुरुवारी दुपारी विहिरीची तसेच त्यातून काढण्यात आलेल्या कोळशाच्या नमुन्याची पाहणी केली.
सोनारे यांनी सांगितले की विहिरीत २१ फुटावर कोळशाचा थर आढळून आला. हा थर एक फूट रुंद व सहा फूट लांब होता. त्यानंतर मजुरांनी २४ फुटापर्यंत खोदकाम केले. नंतर ते थांबविण्यात आले. या कोळशाचे थरावर माती टाकण्यात आली, असेही सोनारे यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी नरखेड तालुक्यातील मालापूर शिवारात बोअरवेलचे खोदकाम करताना कोळसा आढळून आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. परिणामी,अंबाडा, सायवाडा, इंदरवाडा, रोहणा, कलंभा, गोंडीदिग्रस, मालापूर तसेच आंबाडा लगतच्या वर्धा जिल्ह्यात कोळशाच्या खाणी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. माहिती मिळताच आ. डॉ. आशिष देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे सलील देशमुख, उपविभागीय अधिकारी अविनाश कातडे यांनी या शेताची पाहणी करून कोळशाचे नमुने घेतले. सदर नमुने जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्यामार्फत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे कातडे यांनी सांगितले. (तालुका/प्रतिनिधी)
औद्योगिकीकरणाला भरपूर वाव
या विहिरीत आढळून आलेला हा कोळसा असल्याचे तपासणीअंती स्पष्ट झाल्यास या भागात कोळशाची खाण आहे, हे सिद्ध होईल. त्यामुळे या भागाच्या औद्योगिकीकरणाला भरपूर वाव आहे. कोळसा खाण आणि औद्योगिकीकरण यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. खाणीसाठी वेकोलिने शेती अधिग्रहित केल्यास शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळेल. पर्यायाने या भागात मोठे प्रकल्प उभे राहतील. शेतकरी सुखी होतील.
- आ. डॉ. आशिष देशमुख, काटोल मतदारसंघ