देखभालअभावी कोचला सोडून गेले रेल्वे इंजिन
By Admin | Updated: June 4, 2017 01:55 IST2017-06-04T01:55:18+5:302017-06-04T01:55:18+5:30
रेल्वेगाडीच्या कोचला सोडून इंजिन पुढे गेल्याची घटना मागील आठवड्यात दोन वेळा घडली आहे.

देखभालअभावी कोचला सोडून गेले रेल्वे इंजिन
हावडा मेल घटनेचा अहवाल दपूम रेल्वेला सोपविला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेगाडीच्या कोचला सोडून इंजिन पुढे गेल्याची घटना मागील आठवड्यात दोन वेळा घडली आहे. तज्ज्ञांच्या मते याचे मुख्य कारण इंजिनची योग्य देखभाल न करणे हे आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांचा जीव धोक्यात पडत आहे. मागील काही दिवसांपूर्वी बल्लारशाजवळ राजधानी एक्स्प्रेसचे इंजिन कोचला सोडून पुढे गेले होते.
अशीच घटना शुक्रवारी हावडा मेलबाबत घडली. सालवा-चाचेर जवळ घडलेल्या या घटनेत अचानक मोठा आवाज होऊन रेल्वेगाडीचे कोच आणि इंजिनच्या मधील कपलिंग तुटले. त्यामुळे इंजिन पुढे निघून गेले आणि कोच मागे राहिले. त्यानंतर नवी कपलिंग लावून इंजिन कोचला जोडून गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार हावडा मेलचे इंजिन दक्षिण पूर्व रेल्वेच्या संतरागाछी लोको शेडमधील होते. या इंजिनची योग्य देखभाल न केल्यामुळे कपलिंग तुटल्याची घटना घडली असावी असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
या घटनेबाबत दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमित कुमार अग्रवाल यांनी सांगितले की, ही गंभीर घटना आहे. विभागातील सालवा-चाचेर येथे ही घटना घडली. या घटनेचा विभागीय स्तरावर प्राथमिक तपास करण्यात आला आहे. तपासात कपलिंग आणि इंजिनमध्ये त्रुटी असल्याची माहिती पुढे आली आहे.
इंजिन संतरागाछी लोको शेडमधील असल्यामुळे तुटलेली कपलिंग, विभागीय तपासणीचा अहवाल दक्षिण पूर्व रेल्वेला सोपविण्यात आला आहे.
आता या घटनेचे विश्लेषण करून दोषींचा शोध घेऊन त्यांना शिक्षा देण्याची जबाबदारी दक्षिण पूर्व रेल्वेची असल्याचे त्यांनी सांगितले.
दपूम रेल्वेच्या कार्यपद्धतीवर शंका
तज्ज्ञांच्या मते रेल्वे बोर्डाचा नियम आहे की कोणत्याही गाडीचा प्रवास ३०० ते ३५० किलोमीटर पूर्ण झाल्यानंतर सुविधा असलेल्या रेल्वेस्थानकावर त्या गाडीचे ‘इन रुट एक्झामिनिशन’ करण्यात यावे. या नियमानुसार अपघात घडलेली हावडा मेलची यांत्रिक तपासणी रायपूर आणि बिलासपूर स्थानकावर व्हावयास हवी होती. रायपूरला गाडी १० मिनिट आणि बिलासपूरला १५ मिनिट थांबते. जर तेथे योग्यरीत्या यांत्रिक तपासणी केली असती तर कपलिंगची त्रुटी आढळून त्याची दुरुस्ती केल्या जाऊ शकली असती.