CM Devendra Fadnavis: नागपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी एका मुलाखतीदरम्यान गंभीर आरोप केला होता. मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठी सरकारमधील एक उपमुख्यमंत्रीच हे घडवून आणत असतील, असा दावा ठाकरे यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्याचा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस समाचार घेत हे वक्तव्य मूर्खपणाचं असल्याचं म्हटलं आहे.
आदित्य ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याविषयी नागपुरातील पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "असं वक्तव्य करणं हा मूर्खपणा आहे. काही लोकं अशा घटनांमध्येही राजकारण करण्याचा प्रयत्न करत असतात. त्या वक्तव्याला काहीही अर्थ नाही. घटना गंभीर आहे, या घटनेला कोणताही राजकीय अँगल नाही. या घटनेला कारणीभूत असणाऱ्या लोकांना कठोर शासन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही," अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली आहे.
आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
नागपूर हिंसाचाराबद्दल बोलताना आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं की, "ज्या शहराबद्दल आपण बोलतोय, त्या नागपूरमधून राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री येतात. जेव्हा पेटवा पेटवी होत होती, तेव्हा पोलीस उशिराने आले असं तिथले स्थानिक बोलत आहेत. जेव्हा अशा घटना घडतात, ठिणगी पडते तेव्हा त्याचे इंटेलिजेंस रिपोर्ट मुख्यमंत्र्यांकडे येणे गरजेचे असते. महाराष्ट्रात सरकार बनल्यानंतर बीड असेल, परभणी असेल बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत. त्यात कधीतरी फोटो लीक होतात. माध्यमात काही गोष्टी येतात. कदाचित जे पेटवा पेटवी करत आहेत, त्यात मंत्रिमंडळातील काही लोक असतील. मुख्यमंत्र्यांनंतर एक उपमुख्यमंत्री भाषण करतात. आपण किती मोठे आहोत, आपलं वाचन आहे हे दाखवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनंतर ते बोलले. सरकारमध्ये कुणीतरी असं आहे जे मुख्यमंत्र्यांना जुमानत नाही, हे लोकांसमोर आले पाहिजे. सरकारमध्ये सर्व काही ठीक आहे असं नाही. काही तरी गडबड आहे. एकमेकांवर बऱ्याचदा टीकाटिप्पणी करत असतात. त्यामुळे त्यांच्या युतीमधीलच कुणी फडणवीसांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय का, याचा विचार केला पाहिजे," असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला होता.