सुरेश सोनी : आरोपांचे खंडन नागपूर : व्यापमं घोटाळ्यात अडकलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ पदाधिकारी सुरेश सोनी यांनी अखेर आपले मौन सोडले. त्यांच्या विरोधात राजकीय षड्यंत्र रचण्यात आले असल्याचे स्पष्ट करीत यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांवर सुरू असलेल्या चर्चेचाही त्यांनी निषेध केला. यावरील मीडिया ट्रायल बंद करावी, असेही ते म्हणाले. व्यापमं घोटाळ्याने मध्य प्रदेशातील भाजपा सरकारला अडचणीत आणले आहे. या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक के.सी. सुदर्शन आणि वरिष्ठ पदाधिकारी सुरेश सोनी आरोपीच्या पिंजऱ्यात अडकले आहे. स्वत: सरसंघचालक मोहन भागवत यांनी शुक्रवारी आपली प्रतिक्रिया व्यक्त करीत कायदा आपले काम करेल, असे स्पष्ट केले होते. शनिवारी सोनी यांनी सुद्धा मौन सोडले. विज्ञान भारतीच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी ते नागपुरात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायालयावर विश्वास व्यक्त करीत त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा करायला हवी. परंतु मीडियावर सातत्याने चर्चा घडवली जात असल्याने आधीच दोषी ठरविले जात आहे. न्यायालयाच्या निर्णयाची आम्हा सर्वांनी प्रतीक्षा करायला हवी. सोनी यांनी त्यांच्यावर आरोप लावणारे मिहीर यांच्याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी सांगितले की, मिहीर यांनी स्वत: कधीच विमानाने प्रवास केला नाही. तेव्हा त्यांच्याकडून माझ्यासाठी विमानाचे तिकीट दिल्याची गोष्ट न समजण्यासारखी आहे. यापूर्वी सोनी पत्रकारांच्या प्रश्नांपासून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत होते. पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी मौन धारण केले होते. सूत्रानुसार सोनी यांनी रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृती भवनात संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी प्रदीर्घ चर्चा केली. या बैठकीत संघाकडून मिळालेल्या हिरव्या झेंडीनंतरच सोनी यांनी आपली बाजू मांडली. (प्रतिनिधी)
मीडिया ट्रायल बंद व्हावी
By admin | Updated: June 29, 2014 00:40 IST