चक्रासनात भराभर चढला १०२ पायऱ्या ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:08 IST2020-12-06T04:08:14+5:302020-12-06T04:08:14+5:30
नागपूर : नागपूरसाठी विश्वविक्रम आता नवे राहिले नाहीत. दरवर्षी नवनव्या विक्रमांची नोद नागपूरकरांकडून केली जात आहे आणि देशात नागपूरची ...

चक्रासनात भराभर चढला १०२ पायऱ्या ()
नागपूर : नागपूरसाठी विश्वविक्रम आता नवे राहिले नाहीत. दरवर्षी नवनव्या विक्रमांची नोद नागपूरकरांकडून केली जात आहे आणि देशात नागपूरची ओळख संत्रानगरी पाठोपाठ आता विक्रमनगरी म्हणूनही व्हायला लागली आहे. अशाच विक्रमांत आणखी एक भर पडली आहे आणि ही भर नावीन्यपूर्ण आहे. शहरातील सहा वर्षाच्या चिमुकल्याने अतिशय अवघड अशा चक्रासनात एक-दोन किंवा १०-२० नव्हे तर तब्बल १०२ पायऱ्या चढण्याचा पराक्रम केला आहे.
राघव साहिल भांगडे हा सहा वर्षाचा कराटेपटू अनपेक्षितपणे तरबेज निघाला आणि त्याच्या शिक्षकाने तीच संधी साधण्याची प्रेरणा दिल्याने, हा नवा विक्रम नागपूरच्या खात्यात पडणार आहे. राघव हा सिव्हिल लाईन्स येथील भवन्समधील पहिल्या वर्गाचा विद्यार्थी आहे. शनिवारी ५ डिसेंबर रोजी त्याचे कराटे व योग शिक्षक विजय गिजारे यांच्या मार्गदर्शनात बाजीप्रभूनगर येथील स्वत:च्या घराच्या इमारतीत अर्थात पुष्पविला अपार्टमेंटच्या १०२ पायऱ्या राघवने चक्रासनात १ मिनिट ५१ सेकंदात पार केल्या. अशा प्रकारचा हा एकमेव विक्रम असल्याने या नव्या विक्रमाबाबत अनेकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे आणि विशेष म्हणजे प्राचीन भारतीय योगशास्त्राच्या माध्यमातून स्थापित झालेल्या या विक्रमावर चिमुकल्या राघवचे नाव अंकित झाले आहे. यावेळी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डची चमू उपस्थित होती आणि लवकरच विक्रमाची नोंद झाल्याचे प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे.
* गेल्या वर्षी फोडल्या होत्या १२५ टाईल्स
गेल्या वर्षी राघवने एका मिनिटात १२५ टाईल्स फोडण्याचा विक्रम स्वत:च्या नावे नोंदवला होता. त्यापूर्वी कराटेमध्ये भूतान येथे पार पडलेल्या खेळ महोत्सवात राघवने एक सुवर्ण व एक कांस्यपदक पटकावले होते.
* अडीच वर्षाचा असताना योग व कराटे शिक्षक विजय गिजारे यांच्याकडे नेले होते. मात्र, वय फारच कमी असल्याने प्रवेश दिला नव्हता. तरीदेखील तो महिनाभर बाहेर बसून सर्व क्रिया न्याहाळत होता. त्याची आवड बघून त्याला प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली. कराटे सोबतच योगक्रियेतही तो उत्तम होता आणि चक्रासनात तो अतिशय तरबेज झाला. म्हणून विजय गिजारे यांच्या प्रोत्साहनाने चक्रासनात पायऱ्या चढण्यासाठी प्रॅक्टीस केली आणि आज हा गड सर झाला.
- ॲड. साहिल भांगडे (वडील)
...........