भिवापूर : गत दोन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण असून, गुरुवारी मध्यरात्री चांगला पाऊसही झाला. वातावरणातील हा बदल मानवी आरोग्यावर परिणामकारक ठरण्याची शक्यता आहे. वातावरणातील गारव्यामुळे ताप, सर्दी व खोकल्याचे रुग्ण वाढत आहे. एकंदरीत अवकाळी पावसामुळे संक्रमणाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा पारा भडकला. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागताच अनेकांनी कूलरसह थंडगार पाणी पिण्यास सुरुवात केली. अशातच गत दोन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे नागरिकांत तापासह अंगदुखीचे प्रमाण वाढले आहेत.
दरम्यान, गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास तासभर दमदार पाऊस झाला. शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सध्या तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशात सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण वाढल्यास संक्रमाणाचा धोका अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.