विद्यापीठाच्या परीक्षांचा मार्ग मोकळा : मनपाची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 22:26 IST2021-03-08T22:25:19+5:302021-03-08T22:26:46+5:30
Clear the way for university examinationsराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘ऑफलाईन’ परीक्षांमधील मोठा अडथळा दूर झाला आहे. अगोदर गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेणाऱ्या नागपूर महानगरपालिकेने आता विद्यापीठाला परीक्षा घेण्याची परवानगी दिली आहे.

विद्यापीठाच्या परीक्षांचा मार्ग मोकळा : मनपाची परवानगी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘ऑफलाईन’ परीक्षांमधील मोठा अडथळा दूर झाला आहे. अगोदर गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेणाऱ्या नागपूर महानगरपालिकेने आता विद्यापीठाला परीक्षा घेण्याची परवानगी दिली आहे. मनपाच्या आडमुठेपणामुळे ऐनवेळी ‘बीएड’च्या परीक्षा स्थगित कराव्या लागल्या होत्या आणि विद्यार्थ्यांना मनस्ताप झाला होता. ‘बीएड’च्या परीक्षा पुढील आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे.
‘कोरोना’बाधितांची संख्या वाढत असल्याने मनपा प्रशासनाने अगोदर ७ मार्च व नंतर १४ मार्चपर्यंत शाळा-महाविद्यालयांचे ‘ऑफलाईन’ वर्ग बंद ठेवण्याचे निर्देश जारी केले. याच कालावधीत ‘बीएड’ प्रथम सत्राच्या रखडलेल्या हिवाळी २०१९ च्या परीक्षांना सुरुवात झाली. मात्र २४ फेब्रुवारी रोजी विद्यार्थी परीक्षा केंद्रावर आल्यानंतर मनपाच्या निर्देशांमुळे विद्यापीठाने परीक्षा स्थगित केली. जर परीक्षा स्थगित केली नाही तर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी भूमिका मनपाकडून घेण्यात आली होती. त्यानंतर मनपाविरोधात विद्यापीठ वर्तुळातून नाराजीचा सूर होता.
अखेर मनपा आयुक्तांनी नवीन दिशानिर्देश जारी केले. त्यात राष्ट्रीय, राज्य शासन स्तरावरील परीक्षांसह विद्यापीठाच्या परीक्षाही कोरोना नियमांचे पालन करून घेता येतील अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या महाविद्यालय स्तरावर होणाऱ्या परीक्षांचा मार्ग मोकळा झाला आहे.
‘इग्नु’च्या परीक्षेच्या वेळी कुठे होते नियम...
जर परीक्षा घेतली तर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा मनपाने विद्यापीठाला दिला होता. शनिवार-रविवार शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. मात्र ६ मार्च रोजी दुपारी २ ते ५ या कालावधीत ‘इग्नु’च्या ‘ऑफलाईन’ परीक्षा नागपूर विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र विभागाच्या इमारतीत पार पडल्या. यावेळी विद्यार्थ्यांची गर्दी मनपाला दिसली नाही का व तेव्हा नियम कुठे गेले होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.