वर्किग कल्चरमध्ये आली स्वच्छता, सुरक्षितता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:07 IST2021-04-07T04:07:45+5:302021-04-07T04:07:45+5:30
कामगार, कर्मचाऱ्यांनी दैनंदिनीमध्ये केले बदल नागपूर : कोरोनामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. या वातावरणातही आपापली कामे प्रत्येक जण करतो ...

वर्किग कल्चरमध्ये आली स्वच्छता, सुरक्षितता
कामगार, कर्मचाऱ्यांनी दैनंदिनीमध्ये केले बदल
नागपूर : कोरोनामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. या वातावरणातही आपापली कामे प्रत्येक जण करतो आहे. घरापासून दूर जाऊन श्रम करणाऱ्या प्रत्येक घटकाने आपल्या वर्किंग कल्चरमध्ये बदल केला आहे. सरकारी, खासगी कार्यालयात काम करणारा कर्मचारी असो की मेहनत करणारा कामगार किंवा मजूर, प्रत्येकाला जीवाची काळजी आहे. त्यामुळे त्याच्या कामात आता स्वच्छता, सुरक्षितता आली आहे.
प्रत्येक घटकाला कोरोनाने आरोग्याच्या बाबतीत सजग केले आहे. सरकारी आस्थापनांमध्ये काम करणारा कर्मचारी पूर्वी स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत होता. कोरोनामुळे या कर्मचाऱ्यांनीदेखील स्वच्छतेकडे कटाक्ष साधला आहे. कोरोनाशी लढा देताना काही छोटे छोटे बदल त्याने आपल्या दैनंदिनीत केले आहे. कार्यालयात वावरताना स्वत:चे नियम घालून दिले आहे. कोरोनामुळे ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय पुढे आला. त्याचे चांगले रिझल्ट कंपन्यांना मिळायला लागले. पण त्याचा काहीसा फटकाही बसला. शारीरिक श्रम करणारे कामगारसुद्धा कोरोनामुळे आरोग्य आणि स्वच्छतेबाबत सतर्क झाले.
- असे काही बदल झाले आहेत.
१) पूर्वी कर्मचारी मस्टर किंवा बायोमेट्रिक मशीनने हजेरी लावत असे, आता फेस रीडिंगने हजेरी लावतात.
२) लिफ्टऐवजी जिन्याचा वापर वाढला.
३) वारंवार सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्याची सवय लागली.
४) वरिष्ठ अधिकारी/सहकारी कर्मचारीसोबत संपर्क कमी होऊ लागला.
५) लंच टाइममध्ये एकटेच जेवण्याची सवय लागली.
६) जास्तीत जास्त पत्रव्यवहार व इतर प्रशासकीय कामकाज ऑनलाईन होऊ लागले.
७) बाहेरगावी शासकीय दौरे कमी झाले.
८) मास्क हा जीवनाचा भाग झाला.
९) इतर संबंधित कार्यालयात जाणे टाळू लागले.
१०) शासकीय ओळखपत्राचे महत्त्व वाढले.
११) कार्यालयात सोशल डिस्टन्सिंग वाढले.
- दररोज कार्यालयाची स्वच्छता होतेच. पण आता कार्यालयात गेल्यानंतर स्वत:चा टेबल, संगणक स्वत:च स्वच्छ करायला लागलो. येणाऱ्या अभ्यागतांचे स्वागत पूर्वी शेकहॅण्ड करून करायचो, आता दोन हात जोडून नमस्कार करायला लागलो. येणाऱ्यांना बसण्यासाठी असलेल्या खुर्च्यांचे अंतर टेबलापासून काही दूर केले. सहकाऱ्यांशी अनावश्यक गप्पा बंद झाल्या. घर ते ऑफीस आणि ऑफीस ते घर हे कटाक्षाने पाळायला लागलो.
डॉ. सोहन चवरे, कर्मचारी, जि.प.
- कोरोनाने ‘वर्क फ्रॉम होम’ कामाच्या या नवीन पद्धतीची ओळख करून दिली. आम्ही ती आत्मसातही केली. त्यामुळे सुरक्षितता आम्हाला लाभली. पण कामाचे तास वाढले आहे. घर आणि ऑफीस याचा ताळमेळ साधताना प्रचंड धावपळ होते. कार्यालयात असताना वेळेवर ब्रेक व्हायचा. त्या वेळेत खानपान व्हायचे. पण आता ब्रेक राहिलेला नाही. फोनवरचे काम जास्त वाढले आहे.
कविता देशपांडे, खासगी कर्मचारी
- आम्ही कचऱ्यात काम करणारे लोकं आहोत. कोरोना पूर्वी आणि कोरोना नंतर काम बदलले नाही. पूर्वी निष्काळजी होती आता काळजी करायला लागलो आहे. आता तोंडाला मास्क, हातात ग्लब्ज, सॅनिटायझरचा वापर, जेवण करताना हात स्वच्छ धुणे, काम संपल्यांनतर सरळ घरू जाणून आंघोळ करून स्वच्छ होणे याकडे जास्त कटाक्ष असतो.
किशोर रोहणकर, सफाई कर्मचारी
- कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी जे नियम घालून दिले आहे, ते नियम आपल्या संस्कृतीचा भाग आहे. बाहेरून आल्यावर, भोजन करण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुणे, रस्त्यावर घाण असेल तर तोंडाला रुमाल लावणे हे सृदृढ आरोग्य ठेवण्यासाठी महत्वाचे आहे. कालातंराने आपण आधुनिक झालो होतो. यासर्वांकडे दूर्लक्ष करीत गेलो. कोरोनाने जुण्या गोष्टीची जाणिव करून दिली आहे. कष्टकऱ्यांना, कामगारांना, कर्मचाऱ्यांना कोरोना गेल्यानंतरही अशीच काळजी घेतल्यास आरोग्यासाठी आरोग्यदायीच आहे.
डॉ. वैशाली अटलोए, आयुर्वेद वाचस्पती