मनपाचे तलाव परिसरात स्वच्छता अभियान
By Admin | Updated: February 14, 2016 03:02 IST2016-02-14T03:02:27+5:302016-02-14T03:02:27+5:30
शहरातील अंबाझरी, फुटाळा, गांधीसागर, सक्करदरा व नाईक तलावांसह महाराजबाग उद्यान परिसरात महापालिकेतर्फे शनिवारी सकाळी दोन तास स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

मनपाचे तलाव परिसरात स्वच्छता अभियान
अधिकारी व कर्मचारी सहभागी : आयुक्तांनी सायकलने फिरून घेतला आढावा
नागपूर : शहरातील अंबाझरी, फुटाळा, गांधीसागर, सक्करदरा व नाईक तलावांसह महाराजबाग उद्यान परिसरात महापालिकेतर्फे शनिवारी सकाळी दोन तास स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात अधिकारी व कर्मचारी हातात झाडू घेऊ न सहभागी झाले होते.
अंबाझरी व फुटाळा तलाव परिसरातील अभियानात आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सहभाग घेतला. तसेच त्यांनी सायकलने फिरून अभियानाचा आढावा घेतला. सोबतच कर्मचारी व अधिकाऱ्यांचा उत्साह वाढविला. महापौर प्रवीण दटके यांच्या मार्गदर्शनात हे अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
अभियानात झोन सभापती वर्षा ठाकरे, गलिच्छ वस्ती निर्मूलन समितीचे सभापती संदीप जाधव, आरोग्य सभापती देवेंद्र मेहर, नगरसेविका उज्ज्वला बनकर, अपर आयुक्त नयना गुंडे, आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर, राजेश कराडे, महेश धमेचा आदी सहभागी झाले होते. अभियान यशस्वी करण्यासाठी झोनस्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर याची जबाबदारी निश्चित करण्यात आली होती. तलावांसोबतच महाराजबाग परिसर व रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. प्लास्टिक, पॉलिथीन, कागद व कचरा गोळा करून परिसर स्वच्छ केला. सेंटर फॉर सस्टनेबल डेव्हलपमेंट सेवाभावी संस्थेने महाराजबाग परिसराच्या स्वच्छतेसाठी सहकार्य केले. यापूर्वीही महापालिकेतर्फे शहराच्या विविध भागात स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)