दिवसा परिसराची सफाई, रात्री घरसफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:49 IST2021-02-05T04:49:11+5:302021-02-05T04:49:11+5:30
महापालिकेचा चोरटा कर्मचारी जेरबंद : सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : झाडलोट (सफाई) करण्याच्या बहाण्याने दिवसा ...

दिवसा परिसराची सफाई, रात्री घरसफाई
महापालिकेचा चोरटा कर्मचारी जेरबंद : सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : झाडलोट (सफाई) करण्याच्या बहाण्याने दिवसा त्या परिसरातील दाराला कुलूप लावलेली घरे बघायची आणि रात्री आपल्या साथीदारांसह त्या दाराचे कुलूप तोडून घरातील साहित्य चोरून न्यायचे, अशी कार्यपद्धती असलेल्या भामट्याला अंबाझरी पोलिसांनी अटक केली. अर्जुन सुरेश साैदे (वय २९) असे या भामट्याचे नाव असून तो महापालिकेचा सफाई कर्मचारी आहे.
अलीकडे अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी-घरफोडीच्या घटनांत वाढ झाल्याने पोलिसांच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी घरफोडी झालेल्या परिसरात खबरे पेरले आणि सीसीटीव्हीवरही नजर रोखली. त्यातून पोलिसांना आरोपींचा छडा लागला. त्या आधारे पोलिसांनी आरोपी अर्जुन साैदे आणि त्याचा साथीदार शुभम डागोर या दोघांना अटक केली. चौकशीत त्यांनी घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून सात एलएडीसह सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
----
आरोपीची डबल ड्युटी
आरोपी अर्जुन साैदे हा दिवस-रात्र डबल ड्युटी करत होता. दिवसा तो सफाईचे काम करायचा आणि रात्री घरफोडी करून चोरीचे साहित्य शुभम डागोरच्या माध्यमातून विकून टाकायचा. पुन्हा राजरोसपणे आपले सफाईचे कामही करायचा. त्यामुळे त्याच्यावर शंका घेण्याचे कारण नव्हते. परंतु अखेर त्याचे बिंग फोडून त्याच्या मुसक्या बांधण्याची कामगिरी पोलीस उपायुक्त विनीता शाहू यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार नरेंद्र हिवरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बजावली.
---
----