शास्त्रीय गायन-वादनाने महोत्सवात रंगत
By Admin | Updated: October 11, 2015 03:06 IST2015-10-11T03:06:21+5:302015-10-11T03:06:21+5:30
लोकरंजनाचे प्रभावी माध्यम असणाऱ्या प्रसार भारतीच्या आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे आकाशवाणी संगीत संमेलनाचे आयोजन सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे करण्यात आले.

शास्त्रीय गायन-वादनाने महोत्सवात रंगत
आकाशवाणी संगीत संमेलन : प्रसार भारतीचे आयोजन
नागपूर : लोकरंजनाचे प्रभावी माध्यम असणाऱ्या प्रसार भारतीच्या आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे आकाशवाणी संगीत संमेलनाचे आयोजन सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे करण्यात आले. याप्रसंगी शास्त्रीय - गायन आणि वादनाच्या प्रभावी सादरीकरणाने रसिकांची दाद घेतली. अभिजात भारतीय वाद्य शहनाई म्हणजे विशुद्ध, मंगलमय प्रसंगात वाजविले जाणारे वाद्य. या संमेलनाचा आरंभ ख्यातनाम कलावंत विकासबाबू व पार्टी, दिल्ली यांच्या शहनाईच्या मधाळ स्वरांनी करण्यात आला.
बनारस घराण्याची वादन परंपरा लाभलेल्या या वादकाचे प्राथमिक गुरू पिता पं. शंभुदयाल होते. त्यानंतर पं. विष्णु प्रसन्ना, अशोककुमार चौरसिया आणि पं. राजेंद्र प्रसन्ना यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. राग यमनने त्यांनी वादनाला प्रारंभ केला. आलाप, ताना गमक, मिंड यांच्या मधुर लयकारीसह विलंबित ते द्रुत असे हे सादरीकरण होते. यानंतर राग मालकंस आणि बनारसचा गोडवा असलेली पूर्वी धून सादर करून त्यांनी वादन संपविले. प्रदीर्घ दमसास, बोटांचे कुशल संचालन यामुळे त्यांचे वादन रंगले. त्यांना श्यामलाल गोपाल दयाल, परवेश कुमार, मंगलाप्रसाद यांनी साथसंगत केली. यानंतर प्रतिभावंत तबलावादक राजकुमार नायगम यांचे एकल वादन झाले. ते बनारस घराण्याचे प्रख्यात गुरु पं. सामताप्रसाद यांचे गंडाबद्ध शिष्य आहेत. त्यांच्या वादनात विविध घराण्याच्या सौंदर्यात्मक शैलीची संमिश्रता आहे. वादनातील स्पष्ट बोल, लयीवरील पकड हे त्यांचे वैशिष्ट्य होते. सीमित वेळेत त्यांनी त्रितालात वादन केले. त्यांना सारंगीवर फारुख लतिफ खान, संवादिनीवर सुभाष दसककर, तानपुऱ्यावर कृष्णा खर्डेनवीस यांनी साथ केली.
या सोहळ्याचे समापन सुप्रसिद्ध गायक पं. विद्याधर व्यास यांच्या गायनाने झाले. ग्वाल्हेर घराण्याच्या पं. पलुस्कर परंपरेतील पं. नारायण व्यास यांचे पुत्र पं. विद्याधर व्यास प्रतिभावंत गायक आहेत. राग सादरीकरणातील शुद्धता व कलात्मकता जोपासणाऱ्या या गायकाने आपल्या भावपूर्ण प्रसन्न गायनाने रसिकांना प्रभावित केले. राग भुपाळी, तराणा, रागेश्री रागाच्या विलंबित व द्रुत लयीतील सादरीकरणाने त्यांनी जिंकले. त्यांना राजेंद्र अंतरकर-तबला, निरंजन लेले-संवादिनी, नेहा रामेकर, कृष्णा खर्डेनवीस यांनी तानपुऱ्यावर संगत केली. संमेलनाचे उद्घाटन केंद्राचे सहायक संचालक आर. के. गोविंदराजन, सहनिर्देशक राजकुमार ढवळे, कार्यक्रम प्रमुख बी. श्रीनिवास, नागपूर दूरदर्शनचे अधिकारी निसारखान यांच्या हस्ते करण्यात आले. आकाशवाणीचे निवेदक अशोक जांभूळकर, श्रद्धा भारद्वाज, राधिका पात्रिकर यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. (प्रतिनिधी)