लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामान्यत: अभिजात कलेला कंटाळवाणे समजले जाते व तिच्यापासून दूर राहिले जाते. पण हा पूर्वग्रहांनी दूषित गैरसमज आहे. अभिजात कलेच्या संस्काराशिवाय मनुष्य परिपक्व होत नाही. माणसाच्या शारीरिक, आध्यात्मिक, मानसिक, भावनिक व बौद्धिक उन्नयनासाठी अभिजात कलेशिवाय पर्याय नाही, असे मनोगत प्रा. शिशिर वर्मा यांनी व्यक्त केले.अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेच्या वर्धापनदिन सोहळ्याच्या वेळी ‘अभिजात कला आणि मी’ या विषयावर प्रा. वर्मा यांनी आपले विचार मांडले. याप्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी अनिल चणाखेकर, महेश पातूरकर, सांरग अभ्यंकर, किशोर भांदककर, दिलीप म्हैसाळकर, महानगर शाखेचे अध्यक्ष सलीम शेख यांच्यासह ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. नीलकांत कुलसंगे, देवेंद्र लुटे, लेखिका कांचन भुताड, कथा लेखिका चित्रा शर्मा आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. प्रा. शिशिर वर्मा पुढे म्हणाले, अभिजात कला प्राथमिक पातळीवर अनाकलनीय असू शकत नाही. ती आशयघन,अर्थघन व भावघन असते. प्रकृतीइतकीच सहजसुंदर व निरागस असते. कलावंतांच्या हृदयापासून रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचण्याची ताकद तिच्यामध्ये असते. तिचा संबंध भावनांशी असल्याने स्वत:ला विसरून तिच्या प्रवाहात झोकून देत तिच्यात समरस होण्याची गरज असते. दृष्टीची, विचारांची व संकल्पनांची स्पष्टता हा श्रेष्ठ कलाकारांमध्ये असलेला महत्त्वाचा गुण होय. महान कलाकार केवळ एक मर्यादित वस्तुविशेष घडवत नाही तर तो एका स्वायत्त सृष्टीची रचना करतो. श्रेष्ठ कलाकृतीत काही सुधारणा करता येत नाही. तिच्यात केलेला प्रत्येक बदल ठिगळाप्रमाणे तिला कुरुप आणि कलंकित करतो. कलेच्या सागरात इतिहास, धर्म, विज्ञान, नीतीशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र आदी सर्वच विषयांचे प्रवाह विसर्जित होतात आणि मोक्ष पावतात. ज्यामुळे कलावंत व रसिकही मानसिकरीत्या अधिक मजबूत, भावनिकरीत्या अधिक स्थिर, संवेदनशील आणि विवेकी बनतो. कला माणसाला निकोप आणि सुदृढ बनवते, अशी भावना त्यांनी मांडली.संचालन सौरभ दास यांनी केले तर आभारप्रदर्शन सचिन गिरी यांनी केले. आयोजनात शाखेच्या प्रमुख कार्यवाह पूजा पिंपळकर भोयर, सारनाथ रामटेके आणि राजेश काळे व शाखेच्या सदस्यांचा सहभाग होता.नाटक जगविणे हाच उद्देशनाट्य परिषदेच्या जुन्या शाखेत स्थान मिळत नसल्याने काही कलावंतांनी परिषदेच्या मध्यवर्ती शाखेकडे नवीन शाखा निर्माण करण्याची मागणी केली. महानगरामध्ये तीन शाखा ठेवण्याची तरतूद नाट्य परिषदेच्या घटनेमध्ये आहे. त्यानुसार २०१५ मध्ये अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष मोहन जोशी यांनी महानगर शाखेला परवानगी दिली व या शाखेची स्थापना झाली. त्यावेळी १०० सदस्य होते. आज शाखेमध्ये नागपूरसह भंडारा, वर्धा, उमरेड व वडसा झाडीपट्टीचेही कलावंत जुळले असल्याचे शाखेचे अध्यक्ष सलीम शेख यांनी सांगितले. वर्षाला १० कार्यक्रम घडवून आणायचे हा नित्यक्रम. नाटक वाढले पाहिजे हाच शाखा स्थापनेमागचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.
बौद्धिक उन्नयनासाठी अभिजात कला महत्त्वाची : शिशिर वर्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 22:54 IST
सामान्यत: अभिजात कलेला कंटाळवाणे समजले जाते व तिच्यापासून दूर राहिले जाते. पण हा पूर्वग्रहांनी दूषित गैरसमज आहे. अभिजात कलेच्या संस्काराशिवाय मनुष्य परिपक्व होत नाही. माणसाच्या शारीरिक, आध्यात्मिक, मानसिक, भावनिक व बौद्धिक उन्नयनासाठी अभिजात कलेशिवाय पर्याय नाही, असे मनोगत प्रा. शिशिर वर्मा यांनी व्यक्त केले.
बौद्धिक उन्नयनासाठी अभिजात कला महत्त्वाची : शिशिर वर्मा
ठळक मुद्देनाट्य परिषदेच्या महानगर शाखेचा वर्धापनदिन साजरा