वीज स्वयंपूर्णतेचा दावा फसवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:39 IST2017-10-10T00:38:59+5:302017-10-10T00:39:15+5:30
महाराष्ट्र हा विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. भारतीय जनता पार्टीने दोन महिन्यांपूर्वी याबाबत दावा केला होता.

वीज स्वयंपूर्णतेचा दावा फसवा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र हा विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. भारतीय जनता पार्टीने दोन महिन्यांपूर्वी याबाबत दावा केला होता. परंतु भाजप सरकारने सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरू केले आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करण्याच्या दाव्यासारखा वीज स्वयंपूर्णतेचा दावाही फसवा आहे, असा आरोप माजी मंत्री मंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी येथे केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर जिल्हा (ग्रामीण) च्या वतीने भारनियमन आणि वाढीव विद्युत बिलाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष माजी मंत्री अनिल देशमुख, ग्रामीण जिल्हाध्यक्ष रमेश बंग, माजी आमदार दीनानाथ पडोळे, नागपूर ग्रामीणचे कार्याध्यक्ष राजाभाऊ ताकसांडे, शहर कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना अनिल देशमुख म्हणाले, भारनियमनामुळे शेतकरी हतबल झाला आहे. पिकांना पाणी देण्याची वेळ आली असताना भारनियमन सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असून त्यांच्या अभ्यासाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भारनियमनामुळे उद्योजक, कारखानदार, दुकानदार, सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. कोळशाअभावी भारनियमन सुरू असल्याचे कारण सांगण्यात येत असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी २२ आॅगस्टलाच सरकारला पत्राद्वारे कोळसा नसल्याने वीज केंद्रे अडचणीत येऊ शकतात, अशी सूचना केली होती.
शासनाने याबाबत योग्य नियोजन का केले नाही, असा प्रश्नही देशमुख यांनी उपस्थित केला. आंदोलनात ईश्वर बाळबुधे, अनिल अहिरकर, दिलीप पनकुले, दुनेश्वर पेठे, महिला अध्यक्ष अलका कांबळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहर उपाध्यक्ष नूतन रेवतकर, राजू नागूलवार, विनोद हेडाऊ, जतीन मलकान, अर्चना हरडे, उज्वला बोढारे, वर्षा श्यामकुळे, अविनाश गोतमारे, बंडु उमरकर, नरेश अडसरे, दिनकर वानखेडे, सुखदेव वंजारी यांच्यासह शहर पदाधिकारी आणि नागपूर ग्रामीणमधून आलेले समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.