शहर काँग्रेसची होणार पुनर्रचना
By Admin | Updated: April 3, 2017 02:51 IST2017-04-03T02:51:06+5:302017-04-03T02:51:06+5:30
महापालिकेच्या निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवातून धडा घेत शहर काँग्रेसची पुनर्रचना केली जाणार आहे.

शहर काँग्रेसची होणार पुनर्रचना
महिनाभरात प्रस्ताव प्रदेश काँग्रेसकडे : विधानसभानिहाय अध्यक्ष नेमण्याचा प्रस्ताव
कमलेश वानखेडे नागपूर
महापालिकेच्या निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवातून धडा घेत शहर काँग्रेसची पुनर्रचना केली जाणार आहे. निवडणुकीत बेजबाबदारपणे वागलेल्या पदाधिकाऱ्यांना बाजूला सारून, पद नसताना काम केलेल्या कार्यकर्त्यांना शहर कार्यकारिणीत सामावून घेण्यात येणार आहे. यासोबतच प्रत्येक विधानसभानिहाय संघटन बळकट करण्यासाठी विधानसभानिहाय एक अध्यक्ष नियुक्त करावा, असा प्रस्तावही प्रदेश काँग्रेसकडे पाठविण्यात येणार आहे.
महापालिका निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवानंतर विकास ठाकरे यांनी शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, प्रदेश काँग्रेसतर्फे राजीनामा नामंजूर करण्यात आला. निवडणुकीनंतर झालेल्या शहर काँग्रेसच्या बैठकीत शहर काँग्रेसची पुनर्रचना करण्याची मागणी समोर आली होती. या मागणीची दखल घेत नव्याने पक्ष बांधणीसाठी पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव प्रदेश काँग्रेसला पाठविला जाणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीत शहर काँग्रेसचे काही पदाधिकारी बेजबाबदारपणे वागले. निवडणूक काळात या पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असती तर वातावरण आणखी बिघडले असते. त्यामुळे आता निवडणुकीनंतर अशा पदाधिकाऱ्यांचा स्वतंत्र अहवाल प्रदेश काँग्रेसला पाठवून त्यांच्याबाबत काय निर्णय घ्यायचा याचे मार्गदर्शन मागितले जाणार आहे. निवडणूक काळात काही पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी केली.
बूथ समितीचीही पुनर्बांधणी
बूथ समित्यांचीही पुनर्बांधणी केली जाणार आहे. शहरातील सहाही विधानसभेत दोन हजार बूथवर शहर काँग्रेसचे बूथ संघटन उभारण्यात येणार आहे. यात बूथ प्रमुखासह १० प्रतिनिधींचा समावेश असेल. बूथ प्रतिनिधी निवडणूक प्रचारापेक्षा फक्त बूथ मॅनेजमेंटचे काम पाहतील. प्रत्येक बूथवर सुमारे १२०० मते असतात. त्या मतदारांची यादी घेऊन बूथवर कार्यरत चमू त्यांच्याशी संपर्क साधेल. त्यांना मतदान केंद्रापर्यंत नेण्याचे नियोजन केले जाईल. उमेदवाराला निवडणुकीत बूथ वाटप करणे, मतदार कार्ड वाटप करणे ही कामे उमेदवाराला आपल्या यंत्रणेमार्फत करावी लागतात. ही कामे आता शहर काँग्रेसच्या बूथ कमिटीमार्फत केली जातील. बूथ समितीसाठी प्रशिक्षण शिबिरही आयोजित केले जाणार आहे.
लोकसभेसाठी संघटन बांधणी
महापालिका निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता लोकसभा निवडणुकीला भक्कमपणे सामोरे जाण्यासाठी शहर काँग्रेसची पुनर्रचना केली जाणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या बूथमध्येही फेररचना केली जाईल. महापालिका निवडणुकीत लक्षणीय मते घेणाऱ्या काँग्रेस उमेदवारांनाही पक्षसंघटनेत स्थान दिले जाईल. पुनर्रचनेचा प्रस्ताव लवकरच प्रदेश काँग्रेसकडे सादर करू. लोकसभा निवडणुकीपर्यंत बूथस्तरीय संघटन उभे केले जाईल.
- विकास ठाकरे, शहर अध्यक्ष, काँग्रेस