शहरात दुसऱ्या दिवशीही शून्य मृत्यूची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:45 IST2021-02-05T04:45:32+5:302021-02-05T04:45:32+5:30
नागपूर : मार्च महिन्यापासून कोरोनाशी दोन हात करीत असतानाच लसीकरणाला सुरुवात झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. यातच मागील काही ...

शहरात दुसऱ्या दिवशीही शून्य मृत्यूची नोंद
नागपूर : मार्च महिन्यापासून कोरोनाशी दोन हात करीत असतानाच लसीकरणाला सुरुवात झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. यातच मागील काही दिवसापासून रुग्णसंख्येत घट होत आहे. शिवाय, शहरात पुन्हा शून्य मृत्यूची नोंद झाल्याने कोरोना नियंत्रणात येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शनिवारी ग्रामीण भागात दोन तर जिल्हाबाहेरील दोन असे एकूण चार मृत्यू झाले. २९४ नव्या रुग्णांची नोंद झाली. बाधितांची एकूण संख्या १,३३,९६४ तर मृतांची संख्या ४,१५४ वर पोहचली.
नागपूर जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. आज ३४७ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या १,२६,५५६ पोहचली आहे. याचा दर ९४.४७ टक्क्यावर गेला आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील २३२, ग्रामीणमधील ६० तर जिल्हाबाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे. रोजच्या चाचण्यांची संख्या मात्र कमी-जास्त होत आहे. शनिवारी ४,१५१ आरटीपीसीआर तर ४९० रॅपिड ॲन्टिजेन अशा एकूण ४,६४१ चाचण्या झाल्या. ॲन्टिजेनमधून ३५ तर आरटीपीसीआरमधून १५९ रुग्ण पॉझिटिव्ह आले.
- ३,२५४ कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण
नागपूर जिल्ह्यात सद्यस्थितीत ३,२५४ कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील ९३७ रुग्ण शासकीयसह विविध खासगी रुग्णालयात तर २,३१७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. सर्वाधिक रुग्ण मेयोमध्ये आहेत. ८२ रुग्ण उपचार घेत आहेत. मेडिकलमध्ये ८० तर, एम्समध्ये २७ रुग्ण दाखल आहेत. विशेष म्हणजे, गंभीर रुग्णांची संख्याही कमी झाली आहे.
- दैनिक संशयित : ४,६४१
- बाधित रुग्ण : १,३३,९६४
_- बरे झालेले : १,२६,५५६
- उपचार घेत असलेले रुग्ण : ३,२५४
- मृत्यू : ४,१५४