शहरात कोव्हॅक्सिनचा साठा संपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:08 IST2021-04-04T04:08:43+5:302021-04-04T04:08:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोविड संक्रमण वाढताच लसीकरण मोहिमेला गती प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु नागपूर शहरात ...

शहरात कोव्हॅक्सिनचा साठा संपला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड संक्रमण वाढताच लसीकरण मोहिमेला गती प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु नागपूर शहरात को-व्हॅक्सीनचा साठाच संपलेला आहे. शनिवारी अनेक केंद्रांमधून लाभार्थ्यांना परत यावे लागले. अशा परिस्थितीत कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेणाऱ्यांना दुसऱ्या डोससाठी अडचणी येऊ शकतात. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दोन केंद्रांवर केवळ तीन दिवसांचाच साठा शिल्लक आहे. मनपा प्रशासनाने सुद्धा कोव्हॅक्सिनचा साठा संपला असल्याची बाब मान्य केली आहे. असे असले तरी कोविशील्डचे १.२८ लाख डोज सुद्धा उपलब्ध आहेत.
मनपाच्या हंसापुरी आयुर्वेदिक दवाखाना, महाल डायग्नोस्टिक सेंटर, विवेका हॉस्पिटल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलसह मेडिकलमधील दोन केंद्रांवर कोव्हॅक्सिन लावली जात आहे. संबंधित केंद्रांवर शुक्रवारी १६६३ लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लावण्यात आले. शनिवारी हंसापुरी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील केंद्रांवर साठा संपल्याची माहिती मिळाली. हंसापुरी दवाखान्यातील केंद्रावर शनिवारी सकाळी ९.३० वाजता लस लावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक गेले. परंतु कोव्हॅक्सिन साठा संपल्याची माहिती देण्यात आली. काही नागरिकांनी स्थानिक नगरसेवक संजय बालपांडे यांच्याकडे तक्रारही केली. ते लगेच केंद्रावर पोहोचले आणि मनपा अधिकाऱ्यांना यासंदर्भात विचारणा केली. परंतु कुणीही समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. त्यानंतर त्यांनी वरिष्ठांनाही माहिती मागितली. तीन तासानंतर कोविशील्डचा साठा पोहोचला. परंतु नागरिकांनी आक्षेप घेतला. त्यांना कोव्हॅक्सिनच लावून घ्यायचे होते.
बसण्याची व्यवस्थाही नाही
आवळेबाबू चौकातील मनपाच्या केंद्रावर तर लोकांना बसण्याची व्यवस्थाही करण्यात आलेली नव्हती. लोकांना उन्हातच उभे राहावे लागले. लसीकरण केंद्रावर बसण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी आदींची व्यवस्था करणे ही सहायक आयुक्तांची जबाबदारी आहे.
वेगळी आयडी बनवण्यासाठी लागले तीन तास
प्रत्येक केंद्रावर लसीच्या आधारावर त्याची आयडी बनवली जाते. हंसापुरी केंद्रावर कोव्हॅक्सिन लावले जात होते. त्याची आयडी बदलण्यासाठी तीन तासाचा वेळ लागला. संबंधित केंदावर दुपारी १२.३० वाजता कोविशील्ड लावण्यास सुरुवात झाली.
६० लाभार्थी परत गेले
हंसापुरी येथील लसीकरण केंद्रावर लस लावण्यासाठी सकाळी ८.३० वाजतापासूनच लोक रांगेत होते. परंतु नंतर त्यांना सांगण्यात आले की, कोव्हॅक्सिनचा साठा संपलेला आहे. याची माहिती मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत साठ्याबाबत काहीही माहिती न मिळाल्याने ६० ते ६० लाभार्थी परत गेले.
चार दिवसात उपलब्ध होणार डोस - चिलकर
मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी सांगितले की, कोव्हॅक्सिनचा साठा संपलेला आहे तर कोवीशील्डचे १.२८ लाख डोस उपलब्ध आहेत. जिथे कोव्हॅक्सिन संपली, तिथे कोविशील्डचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. येत्या चार दिवसात कोव्हॅक्सिनचे डोसही उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ज्यांनी पहिला डोस कोव्हॅक्सिनचा लावला त्यांनी दुसरा डोससुद्धा कोव्हॅक्सिनचाच लावायला हवा.
नियोजनाचा अभाव - बालपांडे
नगरसेवक एड. संजय बालपांडे यांनी सांगितले की, हंसापुरी येथील केंद्रावर शनिवारी नियोजनाचा अभाव स्पष्टपणे दिसून आला. येथे कोव्हॅक्सिन लावून घेण्यासाठी लोक आले होते. परंतु येथील लसचा साठा संपला. कोविशील्डची व्यवस्था करण्यात दुपारचे १२.३० वाजले. परंतु येथे तर लोक कोव्हॅक्सिनसाठी आले होते. लोकांमध्ये रोष दिसून आला. प्रशासनने तातडीने कोव्हॅक्सिन उपलब्ध करून द्यायला हवी.