मार्च एंडिंगच्या वसुलीने नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:10 IST2021-02-16T04:10:23+5:302021-02-16T04:10:23+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : वर्षभराच्या जमाखर्चाचा ताळेबंद तयार करून नफा-ताेटा तपासला जाताे. यासाठी सर्वच शासकीय, खासगी बँका तसेच ...

मार्च एंडिंगच्या वसुलीने नागरिक त्रस्त
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : वर्षभराच्या जमाखर्चाचा ताळेबंद तयार करून नफा-ताेटा तपासला जाताे. यासाठी सर्वच शासकीय, खासगी बँका तसेच स्थानिक स्वराज्य संस्था आपली थकबाकी मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत वसूल करतात. परंतु कोरोनामुळे विस्कटलेली घडी अजूनही रूळावर आली नसताना ‘मार्च एंडिंग’च्या वसुलीने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.
मार्च २०२० पासून तीन महिने कोरोनामुळे संपूर्ण देश थांबला होता. या कालावधीत अनेकांचे उद्योग-व्यवसाय, नोकऱ्या गेल्या. या काळात अनेकांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी आपल्याजवळील जमापुंजी खर्च केली. कसाबसा संसाराचा गाडा हाकण्यासाठी परिश्रम घेतले. या कालावधीत नेहमीचा खर्च करणे अनिवार्य होताच. परंतु हा खर्च करताना उत्पन्न मात्र शून्य होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव जसजसा कमी होत गेला तसतसा लाॅकडाऊनवरील निर्बंध कमी करण्यात आल्याने अनेकांचे उद्योग-व्यवसाय पूर्वपदावर येऊ लागले. परंतु आजही बाजारात पाहिजे तसे व्यवहार होताना दिसत नाहीत. अनेकांची विस्कटलेली आर्थिक घडी पूर्णत: पूर्वपदावर आली नसतानाच आता मार्च एंडिंगच्या वसुलीने त्यांना त्रस्त करून सोडले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमध्ये मोफत तांदूळाशिवाय नागरिकांना शासनाकडून पाहिजे तसे सहकार्य मिळाले नाही. नागरिकांनी स्वकष्टाने घरगुती आर्थिक बजेट सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु मार्च एंडिंगच्या वसुलीमुळे मात्र तो पुरता मेटाकुटीस आला आहे. मार्चपर्यंत होणारा जमाखर्चाच्या हिशेबाला ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
....
थकीत हप्ते भरण्यासाठी पैसा आणायचा कुठून?
ग्रामपंचायत कर, नगर परिषद कर, वीज वितरण कंपनीचे वीजबिल, खासगी शाळांची फी, सहकारी क्षेत्रातील कर्ज, शासकीय बँकांचे कर्ज, नगर परिषद गाळ्यांचा तसेच ग्रामपंचायत गाळ्यांंचा किराया आदींची धडाक्यात वसुली करण्यात येत आहे. वीज बिल भरले नाही, तर वीज जोडणी कापण्याचा सपाटा वीज वितरण कंपनी सुरू करणार, तर बँकांच्या कर्जाचे हप्ते वेळेत भरण्यात आले, नाही तर नोटीस येण्याचा धाक, शाळांची फी भरली नाही, तर पाल्यांच्या शिक्षणाचे काय होणार, याबाबत होणारी चिंता आदी कारणांमुळे नागरिक हैराण झाला आहे. मार्च एंडिंगपर्यंत स्वतःकडील थकीत हप्ते भरण्यासाठी पैसा आणायचा कुठून, या विवंचनेत सध्या नागरिक सापडला आहे.