जुन्या नोटा बदलवण्यासाठी नागरिकांची अजूनही भटकंती
By Admin | Updated: March 21, 2017 01:51 IST2017-03-21T01:51:17+5:302017-03-21T01:51:17+5:30
जुन्या नोटा बदलवून देण्याची मुदत डिसेंबरमध्येच संपली. परंतु कळत नकळत अजूनही अनेकांकडे थोड्या फार जुन्या नोटा शिल्लक आहेत.

जुन्या नोटा बदलवण्यासाठी नागरिकांची अजूनही भटकंती
रिझर्व्ह बँकेत गर्दी : अधिकारीही त्रस्त
नागपूर : जुन्या नोटा बदलवून देण्याची मुदत डिसेंबरमध्येच संपली. परंतु कळत नकळत अजूनही अनेकांकडे थोड्या फार जुन्या नोटा शिल्लक आहेत. या नोटा बदलून घेण्यासाठी लोकांची भटकंती अजूनही सुरूच आहे. यासाठी रिझर्व्ह बँकेतही लोक गर्दी करीत आहेत. परंतु जुन्या नोटा बदलवून देण्याची मुदत संपली असून दरम्यानच्या काळात जे लोक विदेशात होते, किंवा आहेत त्यांच्याजवळच्याच जुन्या नोटा मार्च अखेरपर्यंत बदलवून दिल्या जात असल्याची बाब लक्षात येताच लोकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
सोमवारी असाच प्रकार घडला. रिझर्व्ह बँकेत ३१ मार्चपर्यंत जुन्या नोटा बदलवून मिळतील, या माहितीच्या आधारावर नागरिकांनी रिझर्व्ह बँकेत गर्दी केली. काही जण तर बाहेरगावावरूनही आले होते. बराच वेळ रिझर्व्ह बँकेसमोर ही मंडळी उभी राहिली. परंतु त्यांना आत सोडले जात नव्हते. एका व्यक्तीला आत सोडण्यात आले. त्याला सविस्तर माहिती देण्यात आली परंतु नागरिकांचे समाधान झाले नाही. नागरिक गेटसमोर ठाण मांडून बसले होते.
अखेर रिझर्व्ह बँकेचे सहायक महाव्यवस्थापक एस.एस. रावत हे स्वत: गेटबाहेर आले. त्यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांची समजूत काढली. जुन्या नोटा बदलविण्याची मुदत संपली असून आता केवळ एनआरआयसाठीच ही सवलत असल्याचे त्यांना समजावून सांगण्यात आले. यानंतर नागरिक आपापल्या घरी परत गेले. (प्रतिनिधी)