नागपुरातील नवनाथनगर, राखुंडेनगरचे नागरिक वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 20:18 IST2020-06-17T20:14:46+5:302020-06-17T20:18:09+5:30
नवनाथनगर, राखुंडेनगर या वस्त्या ग्रामपंचायत बहादुराअंतर्गत येत असून, या वसाहती गेल्या १५ वर्षांपासून विकासापासून वंचित आहेत. या वस्त्या नागपूर शहर व ग्रामपंचायतमधील पांदण रस्त्याच्या बाजूला वसल्या आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दोन्ही यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदाऱ्या ढकलत आहेत. परिणामी नागरिक समस्येमुळे त्रस्त झाले आहेत.

नागपुरातील नवनाथनगर, राखुंडेनगरचे नागरिक वाऱ्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवनाथनगर, राखुंडेनगर या वस्त्या ग्रामपंचायत बहादुराअंतर्गत येत असून, या वसाहती गेल्या १५ वर्षांपासून विकासापासून वंचित आहेत. या वस्त्या नागपूर शहर व ग्रामपंचायतमधील पांदण रस्त्याच्या बाजूला वसल्या आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दोन्ही यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदाऱ्या ढकलत आहेत. परिणामी नागरिक समस्येमुळे त्रस्त झाले आहेत.
नासुप्रने रस्त्यालगतच्या भूखंडधारकांना रिलिज लेटर दिले आहे. यात रस्ता ४० फुटांचा दर्शविण्यात आला आहे. प्रस्तावित रस्त्याच्या बाजूला गडरलाईनचे टाके आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहात असल्याने नागरिकांना जाणे-येणे कठीण झाले आहे. पावसाळ्यात संपूर्ण वसाहतीला तलावाचे रूप येते. घराघरात पाणी शिरते. त्यामुळे लोकांना संसर्गजन्य आजार होण्याची भीती आहे. वसाहतीत अंतर्गत रस्ते नसल्यामुळे चांगलीच फजिती होत आहे. रस्त्याच्या बाबतीत वस्तीतील नागरिकांनी संघर्ष समिती स्थापन करून, ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी, सरपंच यांना वेळोवेळी निवेदन दिले.
विशेष म्हणजे तत्कालीन पालकमंत्र्यांनी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकरिता ग्रामपंचायतीला आदेश दिले. परंतु त्यांच्या आदेशालाही ग्रामविकास अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविली. मनपाच्या अखत्यारित असलेला ४० फूट रुंदीचा रस्ता करण्याबाबत निवेदन दिले. परंतु हा रस्ता आमच्या अधिकारात येत नसल्याने मनपाच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले. दोन्ही यंत्रणांनी हात वर केल्याने रहिवाशांना अनेक समस्या भेडसावत आहेत.