कचरा, गटारलाईनमुळे गोंड, मठ मोहल्ल्यातील नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:21 IST2021-02-20T04:21:50+5:302021-02-20T04:21:50+5:30
नागपूर : नागपूर शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल होत आहे; परंतु उत्तर नागपुरातील गोंड मोहल्ला आणि मठ मोहल्ला परिसरातील ...

कचरा, गटारलाईनमुळे गोंड, मठ मोहल्ल्यातील नागरिक त्रस्त
नागपूर : नागपूर शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल होत आहे; परंतु उत्तर नागपुरातील गोंड मोहल्ला आणि मठ मोहल्ला परिसरातील नागरिक मात्र विकासापासून कोसो दूर आहेत. त्यांना गटारलाईन, कचरा, गार्डन, आदी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने आपल्या समस्या सोडविण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली.
गटारलाईन वारंवार तुंबते
गोंड मोहल्ला परिसरात अतिशय जुन्या गटारलाईन असल्यामुळे त्या जीर्ण झाल्या आहेत. त्या वारंवार तुंबतात. त्यामुळे घाण पाणी रस्त्यावर तसेच नागरिकांच्या घरांत शिरत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. या भागात सांडपाण्यासाठी १२ इंचांची पाईपलाईन महापालिकेने टाकली; परंतु नागरिकांनी या पाईपलाईनला गटारलाईन जोडल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे या भागातील गटारलाईन बदलून नवी लाईन टाकण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
पाणी, कचऱ्याची समस्या गंभीर
परिसरात नळलाईन आहे; परंतु नळाला एक तासच कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. यात नागरिकांना पिण्याचे पाणीही मिळत नसल्यामुळे ते त्रस्त झाले आहेत. त्यामुळे वापरण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. या भागातील कूपनलिकाही बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. नागरिकांना उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. त्यामुळे महानगरपालिकेने या भागात अधिक वेळ पाणीपुरवठा करण्याची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले. याशिवाय या भागात नागरिक सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकत असल्यामुळे आणि हा कचरा उचलण्यात येत नसल्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. महापालिकेने या भागातील कचरा उचलण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे.
नामांतर स्मारकाची दुरवस्था, गार्डनमध्ये नाहीत खेळणी
या भागात नामांतर स्मारक आहे; परंतु या नामांतर स्मारकाची दुरवस्था झाली आहे. स्मारकातील पाण्याचे फवारे बंद आहेत. शहिदांच्या पुतळ्यांचे रंग उडाले आहेत. स्मारकातील दिवेही नेहमीच बंद राहतात. गोंड मोहल्ल्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अस्वच्छता राहते. त्यामुळे या भागातील स्मारक आणि पुतळ्यांची देखभाल करण्याची मागणी आहे.
मठ-मोहल्ल्यात असामाजिक तत्त्वांचा उपद्रव
मठ-मोहल्ला परिसरात असलेल्या मैदानात कचरा जमा करण्यात येतो. त्यामुळे या भागातील नागरिकांना प्रचंड दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. या मैदानात असामाजिक तत्त्वे गोळा होतात. ते उघड्यावर दारू व गांजा पिणे, जुगार खेळणे असे प्रकार करतात. त्यामुळे परिसरातील लहान मुलांवर वाईट संस्कार घडत आहेत. मैदानाजवळून जाताना महिलांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. या भागातील माता मंदिराजवळही जुगार अड्डा भरविला जातो. पोलिसांना ही बाब माहिती असतानाही कारवाई होत नाही. त्यामुळे या भागात असामाजिक तत्त्वांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे.
गटारलाईन बदलवावी
‘गोंड मोहल्ला परिसरात गटारलाईन वारंवार तुंबते. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप होतो. महानगरपालिकेने या भागातील गटारलाईन बदलण्याची गरज आहे.’
- अरुणा तिरपुडे, महिला
नियमित कचरा उचलावा
‘नागरिक चौकात कचरा टाकत असल्यामुळे दुर्गंधी पसरते. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होऊन नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. महापालिकेने या भागातील कचरा नियमित उचलण्याची व्यवस्था करावी.’
- नेहा मोटघरे, महिला
असामाजित तत्त्वांचा बंदोबस्त व्हावा
‘मठ-मोहल्ला परिसरातील खुल्या मैदानात असामाजिक तत्त्वे गोळा होतात. ते दारू, गांजा पितात, जुगार खेळतात. त्यामुळे महिलांना मैदानाजवळून जाणे शक्य होत नाही. पोलिसांनी या असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करावा.’
- नंदा रोडगे, महिला
कचराघर हटविणे गरजेचे
‘मठ-मोहल्ला परिसरातील मैदानात कचराघर आहे. परिसरातील कचरा येथे आणून टाकण्यात येतो. त्यामुळे वस्तीतील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. त्यासाठी हे कचराघर हटविण्याची गरज आहे.’
- प्रमिला भाटिया, महिला
सार्वजनिक शौचालय तोडावे
‘मठ-मोहल्ला परिसरात जुने सार्वजनिक शौचालय आहे. परंतु या शौचालयाचा नागरिक वापर करीत नाहीत. त्यामुळे या भागात दुर्गंधी पसरली आहे. प्रत्येक नागरिकाच्या घरी शौचालय झाल्यामुळे या सार्वजनिक शौचालयाचा काहीच वापर होत नाही. त्यामुळे हे शौचालय तोडून नागरिकांना दिलासा द्यावा.’
- सुरेंद्र भास्कर, नागरिक
कूपनलिका दुरुस्त कराव्या
‘परिसरातील बहुतांश कूपनलिका बंद आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे महापालिकेने बंद असलेल्या कूपनलिका दुरुस्त करण्यासाठी उपाययोजना करावी.’
- धनराज मेश्राम, नागरिक
.............