चिमुकल्या मुलींवरील बलात्कारामुळे नागरिक संतप्त : लकडगंज ठाण्यावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 00:24 IST2019-03-01T00:23:52+5:302019-03-01T00:24:29+5:30
मिनीमातानगर येथे चार व सहा वर्षाच्या चिमुकली मुलींवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार करण्यात आला. या घटनेमुळे येथील नागरिकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे. गुरुवारी संतप्त नागरिकांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत लकडगंज पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून पीडितांना न्याय देण्याची मागणी केली.

चिमुकल्या मुलींवरील बलात्कारामुळे नागरिक संतप्त : लकडगंज ठाण्यावर मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मिनीमातानगर येथे चार व सहा वर्षाच्या चिमुकली मुलींवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार करण्यात आला. या घटनेमुळे येथील नागरिकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे. गुरुवारी संतप्त नागरिकांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत लकडगंज पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून पीडितांना न्याय देण्याची मागणी केली.
मिनीमातानगर येथील रेल्वे लाईनजवळ एका निर्जन ठिकाणी नराधम आरोपीने या मुलींना चाकूचा धाक दाखवून त्यांच्यावर बलात्कार केला आणि पळून गेला. हातात कपडे घेऊन दोन्ही मुली रस्त्यावर भटकतांना आढळून आल्या. एका मजुराने त्यांना त्यांच्या घरी पोहोचवले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. पोलिसांनी आरोपीला रात्री अटक केली. परंतु नागरिकांचा राग शांत झाला नाही. त्यांनी गुरुवारी दुपारी मोर्चा काढला. मोर्चात सहभागी नागरिक आरोपीचा प्रतिकात्मक पुतळ्याला फासावर लटकवून चालत होते. मोर्चात सर्वच पक्षाचे नेते सहभागी होते. मनपा स्थायी समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रदीप पोहाणे, नगरसेविका चेतना टांक, नगरसेवक अनिल गेंड्रे, राष्ट्रवादीचे नगरसेवक दुनेश्वर पेठे, काँग्रेसचे अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, शिवसेनेचे रविनीश पांंडे आदी सहभागी झाले होते. मिनीमातानगर येथून काढण्यात आलेल्या या मोर्चात सदन सोनवणे, यश जैन, पिंकी वर्मा, सतनामी समाजाचे अध्यक्ष महेंद्र बघेल, धीरेंद्र मार्कंडेय, संदीप कोसरे, कृष्णा खुटेल, हेमंत कुर्रे, भागवत मंडले, सविता देशलहरे, दुलेश्वरी सूर्यवंशी, संगीता पाटील, सीता गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने परिसरातील महिला पुरुष सहभागी झाले होते. हा मोर्चा लकडगंज पोलीस ठाण्यावर पोहोचला तेव्हा परिस्थिती अतिशय तणावपूर्ण झाली होती. कारण तेव्हा आरोपी पोलिसांच्या कोठडीत होता. पोलीस अधिकाऱ्यांनी कठोर कारवाईचे आश्वान दिल्यावरच लोक शांत झाले.
आरोपीला फाशी द्या
दोन चिमुकल्या मुलींवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी मोर्चेकऱ्यांची होती. यासाठी अॅड. उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील नियुक्त करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. याशिवाय पीडित चिमुकल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली. तसेच पूर्व नागपुरातील मिनीमातानगर, डिप्टी सिग्नल, कळमना आदी परिसरात अवैध धंदे रोखणे, गस्त वाढवणे अशी मागणी करणारे निवेदनही सादर करण्यात आले.