कायद्याच्या बंधनात सर्कस चालविणे ही ‘सर्कसच’

By Admin | Updated: November 14, 2015 03:23 IST2015-11-14T03:23:32+5:302015-11-14T03:23:32+5:30

घोडे, श्वान, पोपट यांच्यासारख्या प्राण्यांना एखाद्या समजूतदार माणसासारखे प्रदर्शन करताना पाहणे कुणासाठीही रोमांचकच आहे.

Circus operated in Circulars | कायद्याच्या बंधनात सर्कस चालविणे ही ‘सर्कसच’

कायद्याच्या बंधनात सर्कस चालविणे ही ‘सर्कसच’

पाळीव प्राण्यांच्या आधारानेच मनोरंजन : अस्तित्व सांभाळणेही कठीण
नागपूर : घोडे, श्वान, पोपट यांच्यासारख्या प्राण्यांना एखाद्या समजूतदार माणसासारखे प्रदर्शन करताना पाहणे कुणासाठीही रोमांचकच आहे. लोकांना त्यांच्या सादरीकरणाचे व्यायामाचे आश्चर्यही वाटते. असा अनुभव केवळ सर्कसीतच घेता येणे शक्य आहे. पूर्वी मनोरंजनाची साधने कमी होती त्यावेळी समाजाच्या मनोरंजनाच्या पारंपारिक साधनात सर्कस हे महत्वाचे माध्यम होते. एकेकाळी अतिशय लोकप्रिय असलेल्या सर्कसला मात्र सद्यस्थितीत स्वत:चे अस्तित्व सांभाळणेही कठीण झाले आहे.
मनोरंजनाच्या आधुनिक साधनांनी सर्कसला अजिबात पिछाडीवर टाकले नाही. उलटपक्षी सर्कसचे नाव ऐकल्यावर आजही आबालवृद्ध आकर्षित होतात. पण कायद्याच्या बंधनामुळे सर्कस चालविणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. कस्तूरचंद पार्कवर अमर सर्कस नागरिकांच्या सेवेत प्रारंभ करण्यासाठी तयार आहे. त्याची संपूर्ण तयारी आणि उभारणीही झाली आहे. आवागमन करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सर्कसीचा हा तंबू खुणावत आहे.
लवकरच येथे संगीताची धून सजेल आणि प्रतिभावंत कलावंत आपल्या कौशल्याचे सादरीकरणही करतील. पण सर्कस मालकांना मात्र कायद्याच्या अनेक जाचक अटीतून मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागतो.
सर्कसचे संचालक नीरज गाडगे म्हणाले, कायदेशीर बंधनामुळे सर्कसीचे प्रमुख आकर्षण असलेले हत्ती, वाघ, सिंहासारखे प्राणी सर्कसीतून बाद झाले आहे. सध्या सर्कसीत सात घोडे, विविध प्रजातींचे श्वान आणि सहा आफ्रिकी पोपट आहेत. हे प्राणी एखाद्या कसलेल्या कलावंतांसारखे त्यांचे कौशल्य सादर करतात. याशिवाय चार केनियन, तीन मंगोलियन आणि आठ मणिपुरी व नागालँडच्या कलावंतांसह जवळपास ४५ कलावंत सर्कसीत त्यांचे कौशल्य सादर करतात.
गेल्या दीड दशकापासून सर्कसीत वाघ, अस्वल, बंदर आणि हत्ती यांना मनाई करण्यात आल्याने सर्कसीचे खरे आकर्षण हरविले आहे. पूर्वी या वन्यप्राण्यांची खूप चर्चा व्हायची आणि त्यांना पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दीही व्हायची.
आता काही पशुंच्या आधारावरच प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा आमचा प्रयत्न तोकडा पडतो, त्याचा परिणाम नफ्यावरही होतो, असे गाडगे म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Circus operated in Circulars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.