कार्यालयात ओळखपत्र लावूनच करावे लागणार काम
नागपूर : शासकीय कार्यालयात काम करणार्या अधिकारी व कर्मचार्यांची ओळख सर्वसामान्य नागरिकांना पटावी, यासाठी आता मुख्य सचिवांपासून तर शिपायापर्यंतच्या कर्मचार्यापर्यंत सर्वांनाच कार्यालयात काम करताना ओळखपत्र लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. पी.एस. मीना यांनी बुधवारी त्यासंबंधीचे परिपत्रकच जारी केले आहे. राज्यातील नागरिक त्यांच्या कामाच्या निमित्ताने निरनिराळ्या शासकीय कार्यालयात येत असतात. त्यांच्या कामाशी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांचे नाव व पदनाम माहिती होण्यासाठी किंवा त्यांची भेट घेण्यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचार्यांची ओळख पटणे आवश्यक आहे. प्रत्येक कर्मचारी आणि अधिकार्यांना ओळखपत्र जारी करण्यात आलेले असते. परंतु शासकीय कार्यालयात हजर असलेले अधिकारी कर्मचारी ओळखपत्र वापरत नाहीत. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्यांची ओळख पटविण्यास अडचण येते. अनेकदा याचा गैरफायदा घेतला जातो. स्वत:ला अधिकारी व कर्मचारी असल्याचे सांगून नागरिकांना लुबाडण्याचे प्रकारही होत असतात. एखाद्या जागरुक नागरिकाने अधिकार्याकडे ओळखपत्राची मागणी केल्यास दाखविले जात नाही. यासंबंधात शासनाकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या. विधानसभा आणि विधान परिषदेमध्येसुद्धा हा मुद्दा चांगलाच गाजला होता. या सर्व बाबींची सामान्य प्रशासन विभागाने गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार आता सर्वांनाच ओळखपत्र बाळगणे सक्तीचे केले आहे. इतकेच नव्हे तर सर्व शासकीय अधिकारी व कर्मचार्यांनी कार्यालयात असताना त्यांचे ओळखपत्र त्यांनी दर्शनी भागावर लावावे. जेणेकरून नागरिकांना ते दिसेल व संबंधितांची ओळख पटविता येईल, असे परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. तसेच यात कुचराई करणार्या अधिकारी व कर्मचार्यावर वरिष्ठ अधिकार्यांनी योग्य ती कारवाई करावी, असे निर्देशही जारी केले आहेत. (प्रतिनिधी)