रेल्वेगाडीत सिगारेटचा धूर सोडणे आले अंगलट : १३४ जणांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 12:10 AM2019-11-24T00:10:18+5:302019-11-24T00:12:51+5:30

रेल्वेगाडीत ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणे कायद्याने गुन्हा आहे. मागील दहा महिन्यात रेल्वेगाडी आणि परिसरात सिगारेट ओढणाऱ्या १३४ प्रवाशांविरुद्ध रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई केल्याची माहिती आहे.

Cigarette smoke erupts in train: Action on 134 passengers | रेल्वेगाडीत सिगारेटचा धूर सोडणे आले अंगलट : १३४ जणांना फटका

रेल्वेगाडीत सिगारेटचा धूर सोडणे आले अंगलट : १३४ जणांना फटका

googlenewsNext
ठळक मुद्देदहा महिन्यातील आरपीएफची कारवाई

दयानंद पाईकराव/लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेगाडीत ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणे कायद्याने गुन्हा आहे. अनेकदा ज्वलनशील पदार्थांनी पेट घेतल्यामुळे आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दल याबाबतीत दक्ष राहते. परंतु अनेकजण याकडे दुर्लक्ष करून खुशाल रेल्वेगाडीत सिगारेट ओढतात. अशा प्रवाशांविरुद्ध रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई केली. मागील दहा महिन्यात रेल्वेगाडी आणि परिसरात सिगारेट ओढणाऱ्या १३४ प्रवाशांविरुद्ध रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई केल्याची माहिती आहे.
रेल्वेच्या प्रवासात ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणे, सोबत बाळगणे हा गुन्हा आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ज्वलनशील पदार्थांच्या वाहतुकीला प्रशासनाने मनाई केली आहे. ज्वलनशील पदार्थ सोबत बाळगणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याचे आदेश रेल्वे सुरक्षा दलाला देण्यात आले आहेत. रेल्वे सुरक्षा दल अशा प्रवाशांविरुद्ध रेल्वे अ‍ॅक्ट १६७ नुसार गुन्हा दाखल करते. परंतु अनेक प्रवासी याकडे दुर्लक्ष करतात. ते धावत्या रेल्वेगाडीत तसेच रेल्वे परिसरात खुशाल सिगारेट ओढतात. यामुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. रेल्वे सुरक्षा दल अशा प्रवाशांविरुद्ध नेहमीच कारवाई करते. होय, जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांच्या कालावधीत रेल्वे सुरक्षा दलाने सिगारेट ओढणाऱ्या १३४ प्रवाशांविरुद्ध रेल्वे अ‍ॅक्ट १६७ नुसार कारवाई केली आहे. यात जानेवारी महिन्यात ६, फेब्रुवारीत ५, मार्चमध्ये १४, एप्रिल २३, मे २३, जून २१, जुलै १२, ऑगस्ट १६, सप्टेबरमध्ये १८ आणि ऑक्टोबर महिन्यात ११ प्रवाशांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या कडून दंडापोटी २६ हजार ८०० रुपये वसूल करण्यात आले आहेत. सिगारेट ओढताना पकडल्यानंतर जागीच दंड न भरणाऱ्या सहा जणांना रेल्वे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. रेल्वेत सिगारेट ओढल्यामुळे कारवाईला सामोरे जावे लागत असल्यामुळे प्रवाशांनी प्रवासात सिगारेट ओढू नये, अशा प्रकारची जनजागृती वेळोवेळी रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने करण्यात येते. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे प्रवाशांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे.

प्रवाशांनी सिगारेट ओढणे टाळावे
‘रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रेल्वेत ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणे, सिगारेट ओढणे कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रवाशांविरुद्ध रेल्वे सुरक्षा दलातर्फे नियमितपणे कारवाई करण्यात येते. त्यामुळे प्रवाशांनी कारवाई टाळण्यासाठी प्रवासात सिगारेट ओढणे टाळण्याची गरज आहे.’
भवानी शंकर नाथ, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा दल

Web Title: Cigarette smoke erupts in train: Action on 134 passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.