नवजात बाळाच्या चोरीचा तपास सीआयडी चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 20:07 IST2018-07-17T20:06:58+5:302018-07-17T20:07:57+5:30
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयातून चोरी गेलेल्या नवजात बाळा (मुलगी)च्या प्रकरणाची चौकशी आता सीआयडीमार्फत करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली.

नवजात बाळाच्या चोरीचा तपास सीआयडी चौकशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयातून चोरी गेलेल्या नवजात बाळा (मुलगी)च्या प्रकरणाची चौकशी आता सीआयडीमार्फत करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली.
प्रश्नोत्तराच्या तासात काँग्रेसचे अब्दुल सत्तार यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. चोरी गेलेल्या बाळाची आई दररोज पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहे. तिला तपास सुरू असल्याचे सांगत परत पाठविले जाते. सत्तार यांनी सांगितले की, रुग्णालयात सीसीटीव्ही लागले आहेत. परंतु घटनेच्या वेळी सीसीटीव्ही बंद होते. यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी घटनेच्या वेळी सीसीटीव्ही बंद असल्याची कबुली दिली. मुलीच्या आईजवळ एक बुरखा घातलेली महिला आली. दोघींनी खून वेळ गोष्टी केल्या. त्यानंतर मुलीकडे लक्ष ठेवण्यास सांगून मुलीची आई वॉशरुममध्ये गेली. यादरम्यान ती महिला नवजात बाळाला घेऊन पळाली. महिलेने बुरखा घातला असल्याने तिची ओळख पटू शकली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. परंतु आ. सत्तार यांनी या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली. ती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दुरुस्ती करून ते नेहमी सुरू राहतील, याची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.