सीआयडीकडे फसवणुकीची सात प्रकरणे
By Admin | Updated: August 25, 2014 01:13 IST2014-08-25T01:13:23+5:302014-08-25T01:13:23+5:30
राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) कडे २००९ पासून २०१४ पर्यंत या पाच वर्षात फसवणुकीची सात प्रकरणे आलेली असून अद्यापही या प्रकरणांचा तपास सुरूच आहे.

सीआयडीकडे फसवणुकीची सात प्रकरणे
माहितीचा अधिकार : पाच वर्षातील माहिती
नागपूर : राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) कडे २००९ पासून २०१४ पर्यंत या पाच वर्षात फसवणुकीची सात प्रकरणे आलेली असून अद्यापही या प्रकरणांचा तपास सुरूच आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी प्राप्त केलेली ही माहिती आहे. या प्रकरणांपैकी चार प्रकरणे ओम फायनान्स कंपनीविरोधातील तर तीन प्रकरणे आर्यरूप टुरिझम अँड क्लब रिसॉर्टविरोधातील आहेत. या दोन्ही प्रकरणात २७ आरोपी आहेत. २१० गुंतवणूकदारांची १ कोटी ७९ लाख ८० हजार ६९४ रुपयांनी फसवणूक झालेली आहे.पाच वर्षांच्या या काळात सीआयडीकडे वेगवेगळ्या प्रकारची ७४ प्रकरणे तपासासाठी आलेली आहेत. त्यापैकी २००९ मध्ये ५, २०१० मध्ये ९, २०११ मध्ये ५, २०१२ मध्ये १२, २०१३ मध्ये ९ आणि चालू वर्षी आतापर्यंत ३ प्रकरणे तपासासाठी आलेली आहेत. भ्रष्टाचाराच्या संदर्भातील एकही प्रकरण या विभागाकडे आलेले नाही.
एकूण प्रकरणांपैकी १४ प्रकरणांमध्ये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. त्यापैकी ३ प्रकरणे निकाली निघाली आहेत. त्यापैकी दोन प्रकरणातील आरोपी निर्दोष सुटून एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. त्यामुळे केवळ ११ प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत. (प्रतिनिधी)